smaranika imgडोक्यावर तळपता सूर्य, पायाखाली गार मऊशार वाळू, डोळ्यांसमोर अथांग पसरलेली निळाई, लांबवर अस्पष्ट दिसणारी क्षितिजरेखा, एका बाजूला दूरवर कुठे त्या थंडगार लाटांवर आरूढ होण्याचा चंग  बांधलेले नवशिके सर्फर, तर दुसऱ्या बाजूला किनाऱ्यावर हळुवार पसरत जाणाऱ्या फेसाळ लाटामध्ये आई बाबांबरोबर पाय ओले करत फिरणारे बाळ-गोपाळ, समुद्रकाठच्या रस्त्याने हा सारा नजर टिपत, ताजी हवा अनुभवत मजेत  जाणारे सायकल स्वार… हे सर्व दृश्य होता होईल तेव्हढं मनात साठवून ठेवत, गार हवेच्या झुळुका खात असताना मला क्षणभर वाटून गेलं की गेल्या जन्मी नक्कीच काही चांगलं केल असाव का, म्हणून इतक्या विलॊभनीय ठिकाणी मनात आलं की अर्ध्या तासात पोहोचता येतं. 

बे एरियावर निसर्गाने सौंदर्याची अगदी लयलूट केलीये. एका  बाजूला निळाशार अथांग पॅसिफिक महासागर, त्याच्या किनाऱ्याला गर्द हिरवी वनश्री ल्यालेल्या भरभक्कम पर्वत रांगा, रेडवूड्स ची घनदाट झाडी, वर उत्तरेकडे नापाच्या  जगप्रसिद्ध वायनरीज, पूर्वेकडे पसरलेली बागायती शेती, डोक्यावर (जवळ जवळ वर्षभर) दिसणारं निळंशार आभाळ,स्वच्छ सूर्यप्रकाश आणि त्यासोबत आल्हाददायी आणि कोरड हवामान. 

खर तर SF बे एरिया म्हणजे गोल्डन गेट ब्रिज हे एक समीकरणच आहे. पण त्या व्यतिरिक्तही इकडे बघण्यासारखं,  अनुभवण्यासारखं बरच आहे. फिशरमन वार्फ, आल काट्रज, व्हेल वॉचिंग सफारी, गोल्डन गेट ब्रिजच्या पलीकडचं टुमदार  Sausalito गाव, Reyes National Seashore, शेकडो फूट उंच आणि सात आठशे वर्षे जुन्या रेडवूड झाडांचं Muir Woods National Monument, हजार एक एकरावर पसरलेलं गोल्डेन गेट  पार्क, त्यातील जापनीज टी गार्डन, California Academy ऑफ Sciences, आणि  बोटॅनिकल गार्डन,  सॅन फ्रान्सिस्को ची प्रसिद्ध  केबल कार, लोंबार्ड स्ट्रीट, १७ माइल्स ड्राईव्ह, सॅन्टाक्रूझ पासून खाली Bigsur किंवा पुढे कार्मेल पर्यंत अगदी कुठेही थांबल तरी  नजर खिळवून ठेवेल इतका सुंदर समुद्र किनारा. बर हे कमी म्हणून काय तर वीकएंडला सहज जाता येईल अस नंदनवन म्हणजेच लेक टाहो, लॉन्ग वीकएंडला  Yosemite National Park किंवा LA (लॉस ऍंजिलिस ) अगदीच शक्य!

निसर्गाच्या वरदानाबरोबरच लाभला आहे सरस्वतीचा वरदहस्त, जगातील मोजक्या ख्यातनाम विद्यापीठात 

गणली गेलेली स्टॅनफोर्ड आणि बर्कली त्याची नक्कीच ग्वाही देतात. SF बे एरिया म्हंटल कि ओघानेच येते ती सिलिकॉन व्हॅली-  गुगल, मेटा , अँपल , नेटफ्लिक्स, NVDIA , Cisco, ट्विटर, सेल्स फोर्स ह्यांसारख्या टेकनॉलॉजी च्या जगातील आघाडीच्या कंपन्या, Genentech, Gilead Sciences, Roche, Thermo Fisher Scientific यांसारख्या कैक  biotech आणि Pharma कंपन्या यांचे माहेरघर असल्यामुळे साहजिकच जगभरातील हुशार आणि तल्लख बुद्धीच्या लोकांना तिने न खुणावले तरच नवल. ह्या सरस्वतीच्या सुपुत्रांत आपला मराठी माणूस तर आघाडीवर असणारच! 

मराठी माणूस ह्या बे एरियात छान रुळलाय, रुजलाय, आणि याची प्रचिती तुम्हाला पदोपदी येते. जसं वारी, ढोल-ताशा पथकं, स्थानिक CALAA करांची नाटकं, महाराष्ट्रातून येऊन आपली कला सादर करणारे गुणी मराठी कलावंत आणि  हो इतरत्र अमेरिकेत अतिशय दुर्मिळ असणारी खास मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल असणारी हॉटेलं – अन्नपूर्णा, पुरणपोळी, विष्णूजी की रसोई, स्वराज, वडापाव, जोशी वडापाव.. एक दोन नव्हे तर अगदी दर वर्षी वाढत जाणारी ही यादी. 

प्रत्येकासाठी काहीतरी विशेष राखीव असणाऱ्या या आमच्या बे एरियात येताय ना मग “काय बे” ?

तर आता भेटूया २०२४ च्या अधिवेशनात !! 

-प्रेरणा कुलकर्णी

SUBSCRIBE

Stay Connected