आठवणी १९९९ च्या अधिवेशनाच्या
माझ्या पैठणीचा प्रवास✈️
ज्या काळात फेसबुक, व्हाट्सॲप, इन्स्टाग्रॅम सारखी एकमेकांना संदेश पाठवायची साधने नव्हती अशा काळाची कल्पना करा. अशा काळात आम्ही रजिस्ट्रेशन समितीतल्या स्त्रियांनी अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात काय नेसायचे याची चर्चा सुरू केली. ही काही सोपी गोष्ट नव्हती आणि चर्चेला वेळेची मर्यादा नव्हती. 😂 शेवटी सगळ्यांनी पैठणी नेसायचे ठरविले. पण आमच्यापैकी काहीजणींकडे पैठण्या नव्हत्या. 😟 मी लगेच गोव्यात माझ्या आईकडे आणि मुंबईत माझ्या सासूबाईंकडे संपर्क साधला, वायर करून पैसे पाठविले, आणि बजेटमध्ये बसेल अशी पैठणी पाठवायला सांगितले. मग मज्जाच मज्जा झाली. मग त्या दोघींमध्ये कुणी पैठणी घ्यायची, रंग कुठला, पोत कुठला, डिझाइन कुठले आणि कुठे खरेदी करायची याबद्दल बरीच फोनाफोनी झाली. शेवटी माझ्या सासूबाईंनी पुण्याला जाऊन माझ्यासाठी एका मॅजेंटा [नारंगी?] रंगाची आणि त्यांच्या स्वत:साठी एक अबोली रंगाची पैठणी घेतली. या पैठण्या अधिवेशनापूर्वी काही आठवडे त्यांच्या बरोबरच इकडे आल्या. 😍 जेव्हा मी आता त्या साडीकडे पहाते, तेव्हा मला BMM अधिवेशनाची आठवण येते. आता तंत्र बदलले, फोनची मॉडेल्स जाड होती तेथून लहान स्मार्टफोन झाले. पण पैठणी बदलली नाही, आणि आमच्या १९९९मधल्या समितीचा उत्साहही बदललेला नाही. 🤝🤝
मी नुकतीच १९९६मध्ये सिलिकॉन व्हॅलीत आले होते, आणि एकदोन मराठी कुटुंबांशीच फक्त माझी ओळख झाली होती. तेव्हा BMM अधिवेशन १९९९ मध्ये होणार आहे आणि त्यासाठी स्वयंसेवकांची गरज आहे असे पत्रक मी सनीव्हेल मंदिरात १९९७ मध्ये पाहिल्यावर माझा आनंद गगनात मावेना. 😀 त्या पत्रकाला अनुसरून मी लगेच माझी माहिती कळवली आणि बरीच वाट पाहिली. 🙇🏻♀️ मग एका अनपेक्षित दिवशी एखाद्या मुलाखतीचे बोलावणे यावे तसे माझा रजिस्ट्रेशन समितीत समावेश झाल्याची बातमी समजली. माझी पूर्वी ओळख नसलेली २० मंडळी त्या समितीत होती. सुरुवातीला माझी मलाच पुरती खात्री नव्हती, परंतु मराठी बोलणाऱ्या मंडळींनी भरलेल्या खोलीत शिरताच मी त्यांच्यात मिसळून गेले. 🏡 श्री. शरद गवळी यांची समितीचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली, आणि सगळ्यांचा त्यांना कायम पाठिंबा मिळाला. स्वयंसेवक होणे ही मोठी जबाबदारी आहे. वेळ, शिस्त आणि समजूतदारपणा हे सर्व आम्ही शिकलो. समितीच्या बैठका श्री. शरद व सौ. रेखा गवळी यांच्या घरी होत असत. सुरुवातीला दर महिन्याला, मग महिन्यातून दोनदा, आणि नंतर दर आठवड्याला या बैठका होत असत. रेखाताईंनी आमची चहा, स्नॅक्स आणि मराठी खाद्यपदार्थ देऊन उत्तम सरबराई केली. सगळ्या मंडळींना हास्यविनोद आणि एकमेकांबद्दलच्या आपुलकीचा चांगला अनुभव आला. 💕 दोन वर्षांनी अधिवेशन यशस्वी रीत्या पार पडले. आमच्यात निर्माण झालेले तेव्हाचे मैत्रीचे नाते अतूट राहिले आहे, आणि प्रत्येक दिवशी ते अधिकच बळकट होत चालले आहे. मी जर या कार्यात स्वयसेवक म्हणून भाग घेतलाच नसता, आणि इतक्या छान लोकांची भेट झालीच नसती तर माझे आयुष्य कसे झाले असते असा विचार उगाचच मनात येऊन जातो.
त्या वेळेस माझे वय २५ वर्षांचे होते, आणि मी नुकतीच नेट ॲप कंपनीत नोकरीला लागले होते. माझ्यावर रात्रपाळी, आणखी पेजर ड्यूटी होती. माझ्याकडे [बी.एम्.एम्. बद्दल] लोकांकडून येणाऱ्या विचारणांना उत्तर देण्याचे काम होते, आणि भारतातल्या लोकांना याबद्दल आश्चर्य वाटत असे. सध्या रेकॉर्डेड संदेश येऊ शकतात, पण पूर्वी तसे नव्हते.
अनुभव : कल्पिता नाबर
अनुवाद : प्रा. माधव देशपांडे