Smaranika Web Photo 1
Image credit - Pranita Sakalikar

या वेळची स्मरणिका

माणसांचे लोंढेच्या लोंढे एकाच दिशेने चालले आहेत, ठेवणीतले छान छान कपडे घातलेली लोक लगबगीने निघाली आहेत,  प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहतो आहे,  हे दृश्य पुण्या-मुंबईकडचं नाही बरं! ही शेकडो लोकांची गर्दी जमते सिलिकॉन व्हॅलीमधील बाप्पाच्या उत्सवाला! हे गणपती उत्सवाचं दृश्य म्हणजे मराठी संस्कृती अमेरिकेत कशी रुजली आहे, याची फक्त एक चुणूक आहे.

इथल्या होळीच्या सणालादेखील आपल्या लोकांच्या जोडीने वेगवेगळ्या वर्णाचे अ-भारतीय लोक एकमेकांना रंग लावतात, तल्लीन होऊन ‘झिंगाट’वर ठेका धरतात. बास्केटबॉलसारख्या खेळाच्या सुरुवातीला ढोल ताशाची जोरदार सलामी देतात….. हे असे सगळे पाहिल्यावर भारतीय संस्कृतीचा रंग अमेरिकेला लागल्याची खात्रीच पटते.

ह्या अनोख्या वाटेवर वाटचाल करताना मराठी माणसाला अमेरिकेचा रंग लागला नसता तरच नवल.  मराठी माणसाने देखील अमेरिकेच्या रंगात स्वतःचा रंग मिसळला. दोन संस्कृतीमधले “जे जे उत्तम उदात्त उन्नत” ते ते उचलले आणि आपला एक वेगळाच रंग तयार केला. या वाटचालीला मध्यवर्ती ठेवून या वेळच्या स्मरणिकेचा विषय आहे.

मराठी माणसाला अमेरिकेचा रंग : अमेरिकेला मराठी माणसाचा रंग.

अमेरिकन संस्कृतीमधल्या प्रथा सण उत्सव, इथली जीवनशैली आत्मसात करत असताना मराठी माणसाने या जीवनपद्धतीला कधी मराठी साज चढवला तर कधी मराठी सणांची अमेरिकन आवृत्ती उदयास आणली. कधी मराठी पदार्थांना अमेरिकन रूप दिले, तर कधी अमेरिकन पदार्थांनी सणासुदीच्या पानात जागा मिळवली. आपले क्रिकेट सारखे खेळ, आपले खाद्यपदार्थ अमेरिकेत आता ठायी ठायी स्वतःचे अस्तित्व दाखवू लागले आहेत.

अनेकांनी मराठीचे नाव जागतिक स्तरावर नेऊन ठेवलेआहे. जगभर वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत टेक्नोलॉजीच्या विश्वात अमेरिकन लोकांच्या खांद्याला खांदा लावून मराठी माणसाने उल्लेखनीय काम केले आहे. स्वतःच्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून इथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळात देखील मराठी माणसाने स्वतःचे योगदान दिले आहे.  

तर…अश्या या अमेरिकन मराठी माणसाच्या वाटचालीचे हलके फुलके दर्शन घडवणारी स्मरणिका आम्ही तयार करत आहोत. ही स्मरणिका सजवायला तुम्ही सर्वानी जरूर भाग घ्यायला हवा. अमेरिकेतल्या मराठी माणसाचे प्रतिबिंब जगभर उमटणार आहे. कारण आम्ही ही स्मरणिका इबुक आणि ऑडीयो बुकच्या रुपात देखील उपलब्ध करून देणार आहोत.

आणि हो…! ही स्मरणिका तुम्ही न विसरता एक अविस्मरणीय ठेवा म्हणून घरी घेऊन जावी या करता स्मरणिका टीमने ३-४ खास गोष्टी केल्या आहेत. अहं ….त्या आत्ता नाही सांगणार. तुम्हाला त्या आवडतील हे मात्र निश्चित. 

कविता

वारसा

नव्या जगावर, नव्या मनुवर उमटे अपुला ठसा
अभिनवतेच्या संगे, घेउनी मराठीचा वारसा 

नवीन भूमी, नवी प्रेरणा ,
नवीन संधी, नव्या कल्पना
आव्हानांना सहजी पेले ज्ञानाची लालसा

दुर्दम आशा मनी ठेउनी
यत्नांची ही शर्थ करुनी
गरुडापरी तो आकाशाचा ठाव घेतसे जसा

जरी मिळाली कीर्ती संपदा
नम्र लघवी असू सर्वदा
कृतज्ञतेच्या संस्कारांचा आम्ही घेतला वसा

प्रशांत सागर आणिक प्रवरा
सह्याद्री अन् गिरी सिएरा
वंद्य आम्हाला दोन्ही, देती मायेचा भरवसा

~ अनिता कांत

आग्रहाचे निमंत्रण!

बृहन महाराष्ट्राचे संम्मेलन, आले आनंदाला उधाण,
मराठी संस्कृतीच्या वृद्धीमधे व्हावे आपले योगदान.

मराठी परंपरा, भाषेची होईल ओळख छान,
तुमच्या कथा, कवितांनी जेव्हा सजेल प्रत्येक पान.

गौरवकथा, छंद, चित्रे, जाहिराती,  
तुमच्या समृद्ध लेखंनी करु याची निर्मिती.

असा परिपूर्ण अंक,  नाव ज्याचे स्मरणिका, स्वरचित तुमचे साहित्य आम्हाला लवकरात लवकर पाठवा.

~ उर्मिला केसकर

आग्रहाचे निमंत्रण!

बृहन महाराष्ट्राचे संम्मेलन, आले आनंदाला उधाण,
मराठी संस्कृतीच्या वृद्धीमधे व्हावे आपले योगदान.

मराठी परंपरा, भाषेची होईल ओळख छान,
तुमच्या कथा, कवितांनी जेव्हा सजेल प्रत्येक पान.

गौरवकथा, छंद, चित्रे, जाहिराती,  
तुमच्या समृद्ध लेखंनी करु याची निर्मिती.

असा परिपूर्ण अंक,  नाव ज्याचे स्मरणिका, स्वरचित तुमचे साहित्य आम्हाला लवकरात लवकर पाठवा.

~ उर्मिला केसकर

SUBSCRIBE

Stay Connected