annapurna

जीवन करी जिवित्वा, अन्न हे पूर्णब्रह्म,
उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म II

इतकी वर्षे अमेरिकेत राहूनही प्रत्येक वेळी जेवणाच्या पूर्वी मनातल्या मनात का होईना, हा श्लोक नकळतच म्हंटला जातो. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या २०२४ सालच्या अधिवेशनाच्या भोजनाची आखणी करताना हाच श्लोक पुन्हा एकदा मनात होता. पानामध्ये वाढला गेलेला प्रत्येक पदार्थ हा सकस, रुचकर आणि मनाला समाधान देणारा असला पाहिजे. त्याबरोबरच, तो स्वयंपाकघरातून तुमच्या आमच्या ताटात पोहोचवण्याचे काम हे एखाद्या यज्ञकर्माप्रमाणे पावित्र्य राखून पार पडले पाहिजे असे आम्ही ठरवले आणि ह्या दोन तत्वांवर आम्ही भोजनव्यवस्थेची आखणी केली.

या कामाची धुरा आम्ही आमच्या खांद्यावर घेतली आणि हे काम जबाबदारीने पार पडणारी “आमची” माणसेही आपसूक आमच्या बरोबर गोळा झाली. गेली काही वर्षे श्री. गजानन महाराजांच्या  प्रगट  दिनाच्या उत्सवात दोन-दोन हजार माणसांना भक्तीभावाने, स्वत: रांधून प्रसाद खाऊ घालणारे प्रशांत, अमित, निलेश! पाकक्रियेची आवड असणाऱ्या सोनाली, जुईली, अनघा, दिपाली आणि स्वातीसारख्या सुगरणी! स्टॅनफर्ड विश्वविद्यालयाच्या भोजन व्यवस्थेच्या माहिती तंत्रज्ञानाचे  व्यवस्थापन सांभाळणारी अनु! आसावरी फाऊंडेशनच्या अनेक कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्या सर्व कलाकारांची आत्मीयतेने सरबराई करणारी तेजा! कुठ्ल्याही कार्यक्रमाचे काटेकोर आणि शिस्तबद्ध नियोजन करणाऱ्या नेहाआणि मोनिका! यांच्या नेतृत्वाखाली शंभरहून अधिक जणांचा ताफा तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी सुसज्ज आहे.

पदार्थांची निवड करताना नाविन्य, विविधता, अधिवेशनाची “काय बे” ही संकल्पना आणि स्थानिक वैशिष्ट्ये ह्या गोष्टींवर खास लक्ष दिले आहे. प्रत्येक जेवण एका वेगळ्या सूत्राभोवती गुंफले आहे आणि त्यानुसार सजावट, पार्श्वसंगीत आणि काही खास कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिस्तबद्धता आणि वक्तशीरपणा यावर आम्ही निश्चितच ध्यान देत आहोत. मागील अधिवेशनाच्या भोजन प्रमुखांशी वेळोवेळी चर्चा करून मार्गदर्शन घेत आहोत. बे एरियाची आपुलकी, नव्या-जुन्याची सांगड घालण्याचे कौशल्य आणि इथल्या खास चवी तुमच्या मनात घर करतील, यात शंकाच नाही. अधिवेशनाचे जेवण हा एक सुखद आणि अविस्मरणीय अनुभव राहील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. काय बे, मग येणार ना? सॅन होजे, २८-३० जून, २०२४! आपापल्या दिनदर्शिकेत नोंद करून ठेवा आणि आपली काही खास फर्माईश असल्यास जरूर कळवा!

~ वसुधा पटवर्धन आणि अनिता कांत

खाईन आवडीने (मराठी ब्लॉग)

रुचिरा (पाककृती)

इन्स्टाग्राम रील

स्पर्धा छायाचित्र

SUBSCRIBE

Stay Connected