मराठी साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजेच ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व’ पु.ल. देशपांडे, यांना अभिवादन करून आपण आपल्या वेबसाईटवर अधिवेशनाची मुहूर्तमेढ रोऊ या.
“एका दूरच्या देशात आपण सगळेजण मराठी माणसं म्हणून एकत्र जमलोय. तसं पाहिलं तर या समुदायामध्ये ज्ञानविज्ञानाच्या शाखेमध्ये फार मोठी मान्यता मिळविलेले, तज्ज्ञता मिळवलेले डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, कारखानदार आहेत, विद्वान आहेत, विदुषी आहेत, तंत्रज्ञ आहेत, तंत्रज्ञा आहेत; पण आपल्या निराळेपणाची आणि श्रेष्ठतेची ही सगळी महावस्त्रं बाजूला ठेवून ‘मराठी एवढ्या एकाच भावनेने आपण इथे एकत्र आलेले आहोत. आपण मराठी भाषिक आहोत एवढा एकच धागा आपल्याला एकत्र यायला पुरेसा आहे, याची आपल्याला खात्री आहे. अमेरिकेसारखा हा महाप्रचंड, महाबलाढ्य, महाश्रीमंत देश. ज्या भारतीय वातावरणात लहानपणापासून आपण वाढलो त्याच्यापेक्षा अगदी निराळे वातावरण असलेला हा देश. … पण आपण कुठल्यातरी समान धाग्याने एकमेकांशी बांधले गेलेले आहोत, या आनंद देणाऱ्या अनुभूतीची माणसाला जी निसर्गदत्त ओढ असते ती या असल्या संमेलनाच्या मुळाशी असते. … अहो, तुकारामासारख्या संतांनीसुद्धा म्हटलंय की, ‘माझिया जातीचा मज मिळो कोणी’. इथे ‘जातीचा’ याचा अर्थ माझ्यासारखी ज्याला विठ्ठलाची ओढ आहे, देवाची ओढ आहे, अशा प्रकारचा कोणीतरी मला मिळो. तुकारामाच्या उक्तीप्रमाणे बोलायचं, तर ‘माझिया भाषेचा मज मिळो कोणी’ या भावनेनं आपण इथे एकत्र आलेले आहोत.
कुसुमाग्रजांची एक कविता आहे; ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली जणु तारकादळे नगरात, परि स्मरते आणिक करिते व्याकुळ केव्हा, त्या माजघरातिल मंद दिव्याची वात.’ आपल्या माणसांपासून, आपल्या भाषेपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्यासारख्या मराठी माणसांच्या मनाच्या माजघरामध्ये आजूबाजूला एवढं सारं ऐश्वर्य़ असूनही जिवाला व्याकूळ करणाऱ्या मंद दिव्याच्या वाती ह्या असणारच. ह्या मेळाव्यात अशा माजघरातल्या मंद दिव्याच्या वातींचं स्मरण न होणारं असं कुणी असेल, असं मला वाटत नाही.
मराठी हा आपल्याला प्रेमानं एकत्र जोडणारा धागा आहे, ह्या भावनेनं इतक्या दूर देशात मराठी भाषा ऐकण्या-बोलण्यासाठी इतक्या लोकांनी एकत्र जमावं, ही घटनाच मला आनंददायक वाटते. आपल्या भाषेच्या प्रेमानं एकमेकांच्या जवळ येऊ, एकत्र जेवू, एकत्र गप्पागोष्टी करू, मनाशी दाटून येणाऱ्या कडूगोड आठवणी एकमेकांना सांगू, आपल्या दूर देशातल्या घरच्या आठवणी जागविणारी गाणी गाऊ किंवा ऐकू, या भावनेनं एकत्र जमणारा हा मेळावा पाहिला म्हणजे निराशेने वठत जाणाऱ्या या मनाला आशेची पालवी फुटते.
मित्रहो, हा मेळावा भरवल्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. इतर कोठलाही नसला, तरी वयाच्या वडीलकीच्या अधिकारानं म्हणतो की, असेच एकत्र या. चार मराठी गाणी म्हणा, नाटक करा. कविता वाचा, कथाकथन करा, तात्त्विक मतभेदही असू देत. अस्सल कोल्हापुरी रस्सा करा किंवा चंद्रपुरी वडाभात करा. बहुतेकांच्या घरी मी बार्बेक्यूची शेगडी पाहिलेली आहे. तिच्यावर अमेरिकन गव्हाच्या लोंब्या भाजून का होईना, हुरडा पार्टी करा. असली छोटी छोटी संमेलनं होत राहू दे. अमेरिकेतल्या कुठल्याही गावात तुम्ही असलात तरी त्या वेळेला ते गाव महाराष्ट्रात आलेलं असेल. मनाला अधून मधून खिन्न करणारी तुमची दूरत्वाची भावना त्यातून नाहिशी होईल. मनामध्ये आपलेपण असलं की, सगळीकडे आपली माणसं भेटतात. तेच आपलेपण घेऊन तुम्ही आलात आणि मी सुद्धा आलेलो आहे. तुम्हाला असलं आपलेपण उदंड लाभो, अशा प्रकारची प्रार्थना करतो.”
– पु. ल. देशपांडे
३-७-१९८७
संकलन – अश्विनी कंठी, बे एरिया
टंकलेखन – प्रा.माधव देशपांडे, बे एरिया