सुवर्ण स्मृती

आठवणी १९९९ च्या अधिवेशनाच्या

सांगत आहेत त्या वेळचे महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रकाश भालेराव काका……

१९९७ बोस्टनच्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनानंतर मी, सुहास पाटील आणि तेव्हाचे बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष गप्पा मारत होतो. मी सहज म्हणालो की,”आम्हाला आवडेल बे एरिया मध्ये अधिवेशन करायला.” तर अध्यक्षांनी तिथल्या तिथे पुढच्या अधिवेशनासाठी आमचे नावच जाहीर केले. निवडणुका वगैरे काही झालेच नाही. तेव्हा महाराष्ट्र मंडळाच्या खात्यात फक्त $१२०००-$१३००० एव्हढे भांडवल होते. आम्ही परत आल्यावर लोक गोळा करायला सुरवात केली. आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रोग्राम करायचा अनुभव नव्हता. 

आम्ही कमिटी स्थापन केली. माजी अध्यक्ष आणि जुन्या कमिटीच्या लोकांशी संपर्क साधून विचारत विचारत कामाला सुरवात केली. सगळीच हवशे, नवशे, गवशे मंडळी होती. आम्ही दर रविवारी नियमितपणे भेटायचो. ज्याला प्रेझेंटेशन करायचे आहे तो हजर असायचा. त्यामुळे बजेट लगेच सॅंक्शन व्हायचे. एकूण १३० कार्यकर्ते होते. आता त्यावेळचे काम केलेले लोक थकले आहेत. तिघे-चौघे तर हयात नाहीत. तेव्हा ४-५ जण core कमिटी मध्ये होतो आणि फक्त ८-९ tracks होते.आम्ही १.५ मिलियन डॉलर्स गोळा केले. आमचा खर्च साधारण १ मिलियन होता. आम्ही ठरवले कि उरलेले पैसे बँकेत ठेऊन त्या व्याजावर मराठी प्रोग्राम करावेत. या अधिवेशनानंतर कला, नुपूर, स्वर-सुधा सारख्या नवीन संस्था निर्माण झाल्या. जे लोक मंडळाच्या प्रोग्रामला भेटायचे ते कमिटीच्या निमित्ताने एकत्र आले, चांगले मित्र बनले, अगदी घरच्या सारखे! आणि ही गोष्ट अनमोल आहे. तिची तुलना होऊ शकत नाही.  

आम्ही किती अनअनुभवी होतो, याचे उदहारण सांगतो. आपसात गप्पा मारताना आम्ही म्हणालो कि माधुरी दीक्षित आली तर किती मजा येईल. तिची बहीण कमिटीमधे होती. तिने माधुरीचे येणे नक्की केले. माधुरीने फक्त जाण्या-येण्याचे तिकीट आणि राहण्यासाठी जागा मागितली. आम्ही खूप खूष होऊन तिचा प्रोग्रॅम ठेवला. खरेतर सगळे प्रोग्राम अगोदरच ठरले होते. आम्ही माधुरीचा प्रोग्राम मध्येच घुसवला. दुपारी चार ते सहा. तिच्या मुलाखतीनंतर ‘रणांगण’ नावाचे नाटक होते आणि हा त्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होता. त्याकरता ३० कलाकार भारतातून आले होते. त्याचा सेट मोठा होता. माधुरीची मुलाखत संपल्यावर नाटकाचा सेट उभा करायला १० वाजले आणि नाटक संपायला पहाटेचा एक वाजला. गंभीर नाटक, पहिला प्रयोग. हा आमचा निर्णय काही चांगला ठरला नाही. लोकांना हलका विषय असलेले नाटक हवे असते. 

दुसऱ्या दिवशी ४ जुलैची सुट्टी होती. सेट काढून हॉल रिकामा करायला तिप्पट खर्च आला आणि आमचे वाचलेले $५,००,००० निम्यावर आले. त्या वेळी आम्हाला कन्व्हेन्शन सेंटरच्या कामगारांची लेबर युनियन असते आणि  पब्लिक हॉलिडेला त्यांना काम करावे लागले तर तिप्पट चार्ज करते, हे माहित नव्हते. आम्हाला $२,८०, ००० चा जबरदस्त फटका बसला. अजून एक मजा म्हणजे, माधुरी दीक्षितला पोलीस संरक्षण दिले होते. सॅन होजेचे ७-८ पोलीस तिच्याभोवती होते. त्यांना पण भरमसाठ पैसे द्यावे लागले.  खरे तर त्याची जरूर नव्हती, असे वाटते. मराठी लोक सभ्य असतात. कोणी तिच्या जास्त जवळ गेले नव्हते. कोणीतरी पोलीस संरक्षणाची व्यवस्था केली… झाले.  

आता आम्हाला गणित कळलं आहे. कोणत्या वयोगटाची लोक जास्त येणार आहेत आणि त्यांना काय आवडते, त्याप्रमाणे प्रोग्राम ठरवायला पाहिजेत. “खेळ मांडियेला”सगळ्या वयोगटासाठी होता आणि त्यात गाणी, नाच सगळे होते. त्यामुळे तो प्रोग्राम जवळ जवळ सगळ्यानी पाहिला. लोकांना प्रचंड आवडला. आम्ही त्याचे नंतर शिवाय ४-५  प्रयोग केले. 

 माझ्या घराचा पत्ता हा अधिवेशनाचा ऑफिशिअल पत्ता होता. सगळे चेक याच पत्त्यावर यायचे. बहुतेक भांडण इथेच संपायची. माझा घराचा फॅक्स आम्ही अधिवेशनासाठीपण वापरला होता. जसेजसे अधिवेशन जवळ येऊ लागले, जवळ जवळ दीड महिना अगोदर मला फॅक्स येऊ लागले. थँक यू, आम्हाला अधिवेशनाला यायला आवडेल आणि आमचे मानधन इतके असेल वगैरे. उर्मिला मातोंडकरचा आला, सदाशिव अमरापूरकरचा आला. ममता कुलकर्णीचा फोन आला. मला कळेना हे काय आहे?  मग समजले की एक हितचिंतक भारतात गेले असताना सगळ्यांना भेटून आमंत्रणे देऊन आले होते. सगळे कार्यक्रम अगोदरच ठरलेले होते. मग त्यांच्या हात पाया पडून सांगितले की आमचे कार्यक्रम अगोदरच ठरले आहेत आणि पुढच्या वेळेस बोलवू. 

अजून एक सांगतो …मुकुंद मराठेने सुचवले कि आपण विजया मेहताचे ‘हयवदन’ नाटक आणूया. म्हणून आम्ही त्यांना फोन केला. त्या वेळी कमिटीतले एका गृहस्थांनी, विजयाताईंनाच विचारले कि तुम्ही किती नाटके लिहिली आहेत आणि किती केली आहेत. त्या एकदम गप्पच झाल्या. काय बोलावे हेच त्यांना सुचले नसेल. 

सगळ्यात मोठी मजा म्हणजे ….
मी आणि मुकुंदने आशाताईना  बोलवायचे ठरवले. त्यावेळी त्या लास वेगासला आल्या होत्या. आम्ही त्यांना तिथे भेटायला गेलो. त्या, त्यांचा मुलगा, मी आणि मुकुंद मराठे एवढेच होतो. त्यांनी विचारले की प्रोग्रॅम काय आहे? आम्ही सांगितले कि थोड्या गप्पा आणि मग गाणी. आशाताई म्हणाल्या, मी गाणे गाणार नाही. आम्ही विचारात पडलो. लोक तर गाणी ऐकायला येणार. त्यांचा मुलगाच सर्व ठरवत होता. मग त्याच्याशी बोलून आम्ही बाहेर पडलो. प्रोग्रॅमच्या वेळेस सुधीर गाडगीळ होते गप्पा गोष्टी करायला. स्टेजवर आल्यावर त्या म्हणाल्या कि मी गप्पागोष्टी करायला आले आहे. अधिवेशनाच्या कार्यकर्त्यांनी मला असे सांगितले आहे. आमचे विंगेमध्ये धाबे दणाणले. पण त्या बहुतेक गप्पा मारता मारता त्या विसरल्या आणि खूप छान गाणी गायल्या.

मुलाखत: अश्विनी कंठी
शब्दांकन : सुनिता श्रोत्री


How can we help you?