१९९९ सालचे सॅन होजे येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन
तिन्ही वेळेचे जेवण देण्याची प्रथा सुरू करणारे अधिवेशन
१९९७ साली बोस्टन येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे आठवे अधिवेशन जुलै महिन्यात पार पडले आणि नववे अधिवेशन सिलिकॉन व्हॅलीत भरणार अशी घोषणा बृहन महाराष्ट्र मंडळाने ऑक्टोबर महिन्यात केली. १९९१ मध्ये लॉन्ग बीच, कॅलिफोर्निया येथे भरलेल्या अधिवेशनानंतर आठ वर्षांनी हे अधिवेशन परत अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर भरणार होते. त्याआधी काही वर्षे सिलिकॉन व्हॅलीत नुकत्याच उगम पावलेल्या कॉम्प्युटर युगामुळे उद्योग जगतात नव्या शतकात आघाडीची ठरणार हे स्पष्ट दिसू लागले होते. काही वर्षातच म्हणजे ३१ डिसेंबर १९९९च्या रात्री वाय टू के या कॉम्प्युटर मधील त्रुटीमुळे जगातील सर्व कॉम्प्युटर बंद पडतील अशी भीती व्यक्त केली जात होती आणि सिलिकॉन व्हॅली बरोबरच जगातील सर्व कॉम्प्युटर इंजिनियर हा प्रश्न सोडवण्यासाठी झटत होते. कॉम्प्युटर क्षेत्रात काम करणारे भारतीय आणि विशेष करून मराठी इंजिनीयर सिलिकॉन व्हॅलीत स्थायिक व्हायला काही वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती.
अधिवेशनाला उपस्थित राहणार का नाही हा प्रश्नच माझ्या बाबतीत उद्भवत नव्हता. तोपर्यंत झालेल्या सर्व अधिवेशनांना मी उपस्थित होतो. मला अमेरिकेत स्थायिक होऊन 23 वर्षे लोटली होती. त्या काळात मी सॅन फ्रान्सिसको आणि त्या जवळील इतर काही गावात कामानिमित्त येऊन गेलो होतो पण प्रत्यक्ष सॅन होजे शहर बघण्याचा योग आला नव्हता. म्हणून सॅन होजे शहर बघण्यास उत्सुक होतो. १९९८ साली माझ्या नोकरीत खूप मग्न असल्याने अधिवेशनाची तयारी कशी चालली आहे हे बृहन महाराष्ट्र मंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष मोरेश्वर पुरंदरे यांच्याशी फोनवर बोलल्यावर आणि बृहन महाराष्ट्र वृत्तातून कळत असे.
१९९९च्या जानेवारी महिन्यात अधिवेशनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर झाली त्यामध्ये प्रामुख्याने सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम, चंद्रलेखा नाट्यसंस्थेचे ‘रणांगण’ हे नाटक आणि शास्त्रज्ञ जयंत नारळीकर व न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी हे अनुक्रमे प्रमुख वक्ते व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील असे घोषित झाले. अधिवेशनाच्या अगदी काही आठवडे आधी माधुरी दीक्षित यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पण होईल असे जाहीर झाले आणि त्यामुळे उत्कंठा वाढली. सुप्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पण असाच आयत्यावेळी ठरला. तोपर्यंत अधिवेशन आयोजकांनी तिन्ही वेळेची जेवणे देण्याची प्रथा पाडली नव्हती. ती प्रथा सॅन होजेने चालू केली व खाजगी खाण्याच्या कक्षांची सोय केली.
प्रत्येक अधिवेशनात माझा बहुतांश वेळ हा माझ्या नीलम ऑडिओ या कंपनीच्या स्टॉलवर जातो. फक्त संध्याकाळचे कार्यक्रम मला बघता येतात. सॅन होजेला तसेच झाले. माझ्या स्टॉलच्या शेजारी सुप्रसिद्ध अभिनेत्री राजेश्री शांताराम हिचा स्त्रियांच्या कपड्यांचा स्टॉल होता असे आठवते. अलुरकर म्युझिक हाऊस, पुणे यांनी लोकप्रिय चित्रपट ‘लाखाची गोष्ट’ याची व्हिडिओ कॅसेट याच अधिवेशनात प्रथम प्रकाशित केली. संध्याकाळच्या कार्यक्रमात गायिका आशा भोसले आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत अपेक्षेप्रमाणे झाली. मात्र चंद्रलेखा नाट्यसंस्थेच्या ‘रणांगण’ या नाटकाने प्रेक्षकांची निराशा केली.
आत्तापर्यंत झालेल्या अधिवेशनांपैकी फक्त सॅन होजे अधिवेशनाचे कोणतेही ऑडिओ अथवा व्हिडिओ रेकॉर्ड अधिवेशन कमिटीने करून बृहन महाराष्ट्र मंडळाला जतन करण्यास दिले नाही याचा खेद होतो.
– श्री. मोहन रानडे