या वेळची स्मरणिका – कोल्हापुरी

बघतायसा न्हवं, येवढी मान्सं भरभरून एका दिशेनी निगाल्याती! भारीतली कापडं करून येवढं. 

लगाबग्गा मानसं एकाच ठिकानी निगाल्याती, तोंडंकशी फुलावानी फुलल्याती! आनी ह्यो काय पुण्या-मुंबईतला देखावा न्हाई राव! ही अशी हज्जारो मान्सांची गर्दी जमते अमेरिकेत, तीबी सिलिकॉन व्हॅलीत, आपल्या गणपती बाप्पाच्या उत्सवापायी! मराठी संस्कृती कशी रुजलीया हितं अमेरिकेत हे कोनी इचारलं तर हितला गणपती उत्सव दाखवा त्यासनी!

ह्या परमुलखात प्रगती करताना मराठी मान्साला अमेरिकेचा रंग लागला तसा अमेरिकेच्या रंगात मराठी मान्साचा रंग मिसळला. आता तालमीत उतरलंका आंगाला तांबडी माती लागायचीच आनी घाम गळायचाच की! त्याच वाटचालीची कहानी सांगायलीय ही स्मरणिका. तिचा विषय हाय.

मराठी माणसाला अमेरिकेचा रंग
अमेरिकेला मराठी माणसाचा रंग.

हितल्या उन्हापावसात, वाऱ्यामातीत मराठी मानूस रमनारच की! पन आपला महाराष्ट्र त्यो महाराष्ट्र!
इठ्ठला-पांडुरंगा! त्येला इसरली न्हाईत मान्सं! मराठी मान्सानं हितल्या अमेरिकन संस्कृतीला आपली म्हटलं.

आपला आचार-विचार त्यापरमानं ठेवला. दोन्हीकडं जे काय चांगलं हाय त्येत्ये टिपत गेला आमचा मानूस.
आला अन आपली येगळीच मिस्सळ बनवली म्हना की! हितले सण, हितले उत्सव, हितली शिस्त, ड्रायव्हिंग,घरकाम, स्वैंपाक, फर्निचर बनवणेन्हायतर दुरुस्त करणे, जेकाय आसेल त्ये सोत्ता खपून करायचा बाणा, आसं सगळं आपलं म्हनत सम्दा राबता केला आमच्या मान्सांनी!

हे सम्दं करत असताना मराठी मान्सानं या अमेरिकन जगण्याला कधी मराठी साज चढिवला आणि कधी मराठी सणांना अमेरिकन ठसका दिला.कधी मराठी पदार्थांना अमेरिकन रुपडं दिलं, आनी कधी अमेरिकन पदार्थांना आपल्या सणासुदीच्या पानात मानाची जागा दिली.  आनी आपले खाद्यपदार्थ, आपलं क्रिकेट अमेरिकेत आता पसरत चाललंय.

एकदा का मराठी मान्सानं मनावर घेतलंका मग त्याचं पाऊल मागं पडत न्हाई!  हितल्या समाजात ऱ्हाताना मराठी मान्सं एक ना धा कंपन्या चालिवत्यात, संशोधन करत्यात, शिकिवत्यात, नाना उद्योग, कला, गुंतवणूक, सेवाभावी संस्था, लहान-मोठे उद्योग अश्या सगळ्या आघाड्यांवर काम करताहेत मराठी मान्सं. बे एरिया म्हंजे टेक्नॉलॉजीची पंढरी! इथल्या मातीत येऊन मराठी मान्साच्या अंगात ही टेक्नोलॉजी मुरलीय आपसुकच. बे एरियातल्या मराठी मान्सांनी हितल्या महाप्रचंड टेक्नोलॉजी कंपन्यांना आपला हातभार लावलाय. जगभरातल्या मान्सांच्या खांद्याला खांदा लावून मराठी मान्सं जग बदलन्याच्या या कामात रमल्यात तसंच हितल्या सामाजिक अन सांस्कृतिक जीवनातबी झोकून देऊन काम करत्यात!

असा हाय ह्यो आपला अमेरिकन मराठी मानूस. आन्त्येची ही सम्दी वाटचाल. त्याच वाटचालीचा भाग म्हंजे आपली ही स्मरणिका. आपनबी ही स्मरणि का आनुया म्हनलंई-बुकात, न्हायतर ऑडियो बुकात! तुमचं बी इचार येऊं देत त्यात! तुमचे लेख, कविता, चित्रं, व्यंगचित्रं, लहान-मोठ्ठे, तरणेताठे आन् अनुभवी, समद्यांचं म्हणनं कळाय पायजेल. आख्ख्या अमेरिकेत पसरलेला मराठी मानूस काय म्हनतो ते कळाय पायजेल. तवा मंडळी, हे घरचं आवताण समजा! तुमचं लिखाण पाठवा आमच्याकडं. स्पर्धा हायेत त्यात भाग घ्या.

जाताजाता एक सांगतो! ही आपली स्मरणिका हातात घेतल्यावर तुमाला या बे एरियातल्या अधिवेशनाचं. स्मरण व्हावंयासाठी आमच्या टीमनं ३-४ खास गोष्टी केल्यात. काय त्ये सांगू म्हनता? आताच सांगितलं तर काय ऱ्हायलं!  पन त्या आवडतीलच तुमाला याची खात्री देतो आपन!

तर मग काय म्हनता, होऊन जाऊ देत दणका आपल्या स्मरणिकेचा!!

– अनंत सुरेश अंभईकर


How can we help you?