या वेळची स्मरणिका

माणसांचे लोंढेच्या लोंढे एकाच दिशेने चालले आहेत, ठेवणीतले छान छान कपडे घातलेली लोक लगबगीने निघाली आहेत, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहतो आहे, हे दृश्य पुण्या-मुंबईकडचं नाही बरं! ही शेकडो लोकांची गर्दी जमते सिलिकॉन व्हॅलीमधील बाप्पाच्या उत्सवाला!

डिस्नेलँड किंवा टाईम्स स्क्वेअरचा अपवाद वगळता, अमेरिकेत गर्दी होणे तसे दुर्मिळ. रस्त्यावर चालणारी इतकी लोकं हाताळायची सवय नसल्याने अशा वेळी सिग्नल्स बंद केले जातात आणि पोलीस ‘याची देही याची डोळा’ हा सोहळा बघत रहातात. हे गणपती उत्सवाचं दृश्य म्हणजे मराठी संस्कृती अमेरिकेत कशी रुजली आहे, याची फक्त एक चुणूक आहे.

इथल्या होळीच्या सणालादेखील आपल्या लोकांच्या जोडीने वेगवेगळ्या वर्णाचे अ-भारतीय लोक एकमेकांना रंग लावतात, तल्लीन होऊन ‘झिंगाट’वर ठेका धरतात. बास्केटबॉलसारख्या खेळाच्या सुरुवातीला ढोल ताशाची जोरदार सलामी देतात….. हे असे सगळे पाहिल्यावर भारतीय संस्कृतीचा रंग अमेरिकेला लागल्याची खात्रीच पटते.

सातासमुद्रापार आल्यावर मराठी भाषा, सण, उत्सव, परंपरा, कला, साहित्य, अस्सल मराठी पदार्थ अशा अनेक अंगाने बहरलेल्या मराठी संस्कृतीचा आविष्कार अमेरिकेतल्या मातीत रुजवण्याचा प्रयत्न मराठी माणूस आजवर करत आला आहे.

ह्या अनोख्या वाटेवर वाटचाल करताना मराठी माणसाला अमेरिकेचा रंग लागला नसता तरच नवल. मराठी माणसाने देखील अमेरिकेच्या रंगात स्वतःचा रंग मिसळला. दोन संस्कृतीमधले “जे जे उत्तम उदात्त उन्नत” ते ते उचलले आणि आपला एक वेगळाच रंग तयार केला. या वाटचालीला मध्यवर्ती ठेवून या वेळच्या स्मरणिकेचा विषय आहे.

मराठी माणसाला अमेरिकेचा रंग
अमेरिकेला मराठी माणसाचा रंग.

अमेरिकन संस्कृतीमधल्या प्रथा सण उत्सव, इथली जीवनशैली आत्मसात करत असताना मराठी माणसाने या जीवनपद्धतीला कधी मराठी साज चढवला तर कधी मराठी सणांची अमेरिकन आवृत्ती उदयास आणली. कधी मराठी पदार्थांना अमेरिकन रूप दिले, तर कधी अमेरिकन पदार्थांनी सणासुदीच्या पानात जागा मिळवली.

हॅलोवीनला मराठी माणूस भोपळ्याचे जॅक-ओ-लॅन्टर्न बनवतो, आपल्या लहानग्यांना घेऊन ट्रिक आणि ट्रीटची मजा अनुभवतो, थँक्सगिव्हिंगला अमेरिकन पारंपरिक पदार्थांना मराठी ढंगात सादर करतो, मुलाच्या आनंदाकरता ख्रिसमस ट्री उभारतो. गणपती, दिवाळी इथल्या ऑफिसेसमध्ये देशोदेशींच्या लोकांबरोबर मोठ्या प्रमाणावर थाटामाटात साजरे करतो, उकडीचे मोदक, पुरणपोळी, वडापाव आपल्या अ-भारतीय मित्र मैत्रिणीना खाऊ घालतो. आपले क्रिकेट सारखे खेळ, आपले खाद्यपदार्थ अमेरिकेत आता ठायी ठायी स्वतःचे अस्तित्व दाखवू लागले आहेत.

अनेकांनी मराठीचे नाव जागतिक स्तरावर नेऊन ठेवलेआहे. जगभर वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत टेक्नोलॉजीच्या विश्वात अमेरिकन लोकांच्या खांद्याला खांदा लावून मराठी माणसाने उल्लेखनीय काम केले आहे. स्वतःच्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून इथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळात देखील मराठी माणसाने स्वतःचे योगदान दिले आहे.

तर…अश्या या अमेरिकन मराठी माणसाच्या वाटचालीचे हलके फुलके दर्शन घडवणारी स्मरणिका आम्ही तयार करत आहोत. ही स्मरणिका सजवायला तुम्ही सर्वानी जरूर भाग घ्यायला हवा. अमेरिकेतल्या मराठी माणसाचे प्रतिबिंब जगभर उमटणार आहे. कारण आम्ही ही स्मरणिका इबुक आणि ऑडीयो बुकच्या रुपात देखील उपलब्ध करून देणार आहोत.

आणि हो…! ही स्मरणिका तुम्ही न विसरता एक अविस्मरणीय ठेवा म्हणून घरी घेऊन जावी या करता स्मरणिका टीमने ३-४ खास गोष्टी केल्या आहेत. अहं ….त्या आत्ता नाही सांगणार. तुम्हाला त्या आवडतील हे मात्र निश्चित.


How can we help you?