आठवणीतील आजोळ – मऊभाताची मेजवानी

कोकणातील न्याहारी म्हंटलं की, घावन, धिरडी, केळीच्या किंवा हळदीच्या पानावरील पानग्या, आंबोळी, दडपे पोहे आणि मऊभात आठवतो . अलिबाग पासून सिंधुदुर्ग पर्यंत थोड्याबहुत फरकाने असलेले हे न्याहारीचे प्रकार. जे पिकतं   तेच खाण्यात येतं, या उक्तीने तांदूळ, नारळ, पोहे आणि भरपूर दूधदुपतं  ह्याची मेजवानी.

खूप दिवसांनी एकटीसाठीच न्याहारी करायची होती. मग मऊभात करु म्हटलं आणि आठवणींना उजाळाच मिळाला. आत्ताच्या मुलांची जशी ‘मॅगी’ तसा आमचा ‘मऊभात’. त्यातच नुकताच कोकण विषयक लेख वाचनात आला आणि मऊ भाताबरोबर कागद-पेनही हाती आलं. शाळकरी वयात असताना माझ्या आजोळी म्हणजे ‘नागावला’ अनेकदा राहण्याचा योग आला. योग कसला कोणी आलं की, मी निघायचीच मुळी त्यांच्याबरोबर, अर्थात् सुट्टीत.

आजोळचं घर कौलारू शेणाने सारवलेलं  टुमदार होतं. जुन्या घरातील प्रत्येक खोलीला नावं होती माजघर, स्वयंपाकघर, देवघर, आगोठीची खोली, पडवी, ओटी,  मागलं अंगण, पुढलं अंगण. (रेस्ट रूम त्यावेळी घराबाहेर असायच्या). खोल्याच खोल्या होत्या… त्यांना असंख्य कोनाडे होते,  पूर्वी लाकडाची सुरेख मेख म्हणजे ‘खुंट किंवा खुंटी’ भिंतीला असायची. त्यावर पुरुष मंडळींचे टोपी, कपडे विराजमान असायचे. मग ती “खुंटी आणि कोनाडे” ओल्ड फॅशन झाले आणि पुनर्जन्म घेऊन आता “Antic” झाले. घराला लाकडी वासे होते आणि हो, आत्ताच्या भाषेत म्हटलं तर लाकडी फळ्यांचे फॉल सिलिंगही होते. मला आठवतंय, कपडे वाळत घालायला लाकडी बांबू होते, जे सुतळीच्या आधाराने टांगलेले होते. घराभोवतीची बाग म्हणजे वनराईच जणू. मागच्या अंगणात हौद होता. त्यात कधीतरी कलिंगडे  पोहताना दिसायची. त्या शेजारी केळीचं  बन होतं. आणि जवळ विहीर होती. त्याकाळी, अंघोळीचं  पाणी तापवायला मागल्या अंगणी चूल होती. त्यावर भला मोठा हंडा होता. शेजारी गाईचा गोठा होता. चुलीचं  सरपण, केळीच बन आणि विहीर यांजवळ जायला सक्त मनाई असायची. कारण एखादा सर्प (किड- कुरड) लपलेला असेल तर म्हणून.  पण मी मात्र कधीच पाहिलेलं नव्हतं. घराच्या आजूबाजूला असायचे म्हणे  क्वचित. दिसताक्षणी ‘विषारी का बिनविषारी’ ओळखणारी माणसं त्यावेळी घरोघरी होती. त्याकरता कुठल्याही (degree) डिगरीची गरज त्यांना पडली नाही. घरी कोणाला बरं नसलं की, आमचे वैद्य डॉक्टर घरी यायचे. चहा घेत आजोबांशी बराच वेळ गप्पा मारायचे. “घरचा डॉक्टर” आता आपण टीव्हीवर पाहतो. पण खरंच त्यावेळी डॉक्टर घरच्यासारखे घरी जाऊन पेशंटला बघायचे आणि कुठलाही ‘बागलबुवा’ न करता माणसं बरी करायचे.  घरात बैलगाडी होती. घरभर फिरणारी आमची माऊ होती. मोठ्ठा झोपाळा होता त्यामागे वजन काटा होता. गंमत म्हणून एकदा तरी आम्ही त्यात वजन करून घ्यायचो. भरपूर नाती-गोती होती…आजी, काकुआजी, आत्याआजी, आजोबा खूप होते आणि त्यांना टोपण नावं होती. त्याच नावाने आम्ही त्यांना हाक मारायचो. बऱ्याच ठिकाणी पणजी-पणजोबा दिसायचे. काकूआजी निजताना गोष्टी सांगायची, लांबच लांब कोडी घालायची.  त्याची उत्तरही तीच द्यायची. जी आजही माझ्या स्मरणात आहेत.

“अहिल्याबाई होळकरांनी” बांधलेली सुंदर देवळं ‘नागाव आणि चौल’ परिसरात आहेत. जी दगडी आहेत.  ती विशिष्ट वास्तुशास्त्रीय संकल्पनेने बांधलेली असावीत. ज्यांच्यासमोर तळी आहेत अशी. नागेश्वर, वंकनाथ ही त्यापैकी काही. प्रसादाचं ताट किंवा परडी काही म्हणा, घ्यायला त्यावेळी देवळातून गुरव यायचे. ते ती घेऊन गेले की मंडळी दुपारी जेवायला बसायची. आजोबांचे पाट लाकडी होते. त्याला पितळी कमळाची फुलं होती. मला ते पाट फार आवडायचे. त्यावेळी शतपावली करायला अंगणे होती. पण स्वयंपाक घरातून बाहेर बैठक खोलीपर्यंत दोनदा आत-बाहेर केलं, की झाली की ‘शतपावली’! इतकी मोठी घर होती आणि घरासारखीच माणसांची मनंही मोठी होती.

दुपारच्या चहानंतर आजी ओटीवर येऊन बसायची. हातात तांदूळ निवडायचं सूपल असायचं. बाहेरून जाता- येताना कोणीतरी हाक मारायचं. मग चौकश्या व्हायच्या, हातवारे असायचे. अशी गंमत होती. आजी रोज पूर्ण पेपर वाचायची. आजोबांना विचारायची,  हे वाचलंत. . आजोबा मानेने होकार द्यायचे. आजी बोलकी, आजोबा मौनी होते पण प्रचंड धोरणी होते. आजोबांकडून ऐकलेले पोवाडे आजही मनावर राज्य करून आहेत.  एक वर्षी चैत्रगौरीचं हळदीकुंकू आणि आवळी भोजनाचा आनंदही घेता आला.. त्याचं वर्णन अवर्णनीय.. तुळशीचं लग्न म्हणजे लग्न सोहळाच की.. “मग  कोणाकडून तुम्ही आज..” असं विचारून मामा मज्जा करायचा. त्रिपुरी पौर्णिमेला नागेश्वरापाशी संध्याकाळी त्रिपुर प्रज्वलीत करतांत तो दीपोत्सव आजही आठवतो. कलावती आईंचे उपासना-वर्ग तिकडे खूप आहेत. रविवारी आजी लवकर उठवून बालोपासनेला पाठवायची. असे अनेक क्षण मौजेचे असत. आज्जी लहानपणी इन्स्टंट श्रीखंड करायची. घरचं गोड दही त्यात साखर आणि खायचा केशरी रंग झालं की “श्रीखंड”. ‘सुधारस’ करायची म्हणजे साखरेच्या पाकात लिंबाचा रस आणि वेलदोडा…! कमीत कमी साहित्यात खूप पाककृती होत असत. उखळीतलं पोह्यांचं  डांगर, डाळिंब्यांची उसळ, नारळी भात, मोदकांची पाठराखीण म्हणजे निवग्र्या, दिव्यांच्या अमावस्येला होणाऱ्या  रव्याच्या खिरीत कणकेचे गूळ घातलेले दिवे सोडून केलेली नैवेद्याची खीर म्हणजे भन्नाट… आत्ताच्या पंचतारांकित हॉटेलमधील पदार्थांना पाठी टाकतील अशी.

खलबत्ता, पाटा-वरवंटा, जातं , उखळ आता शोभेचे म्हणून घरात हवेतच ‘शोपीस’ म्हणून. पण कधीतरी का होईना, त्यातील पदार्थ खाण्याचं भाग्य आम्हाला लाभलं.. येवढेही नसे थोडके ! “ताटगोळे” कोकण मेवाच, खाऊ तितके कमीच. बाहेरून हिरवे आणि आतून केशरी असे छोटे छोटे चोखायचे आंबे, चाफ्याची आणि बकुळीची फुलं म्हणजे मोह. गुरुवारच्या बाजारात मिळणारी चवाची चिक्की…आहाहा!

तर आता “मऊभात”

सकाळची थंडी, स्वयंपाक घरातून येणारा मऊभाताचा सुगंध, “उठा उठा हो सकळीक” म्हणून जणू आवाजच देत असे. चुलीवरच्या भल्या मोठ्या पातेल्यात होणारा ‘मऊभात’. त्याबरोबर पोह्यांचा पापड, घरचं लोणकढ तूप आणि लोणचं म्हणजे जणू काही मेजवानीच.  मऊभात आणि मेतकूट हे समीकरण जरी असलं तरी त्यावेळी मऊभाता वर मेतकूट घेतलेलं माझ्या आठवणीत नाही. कोवळ्या उन्हात दिसणाऱ्या मऊभाताची वाफ आजही आठवणी जाग्या करते. कमीत कमी साहित्यात होणारा भात…आजीची माया,   गावच्या पाण्याची चव, हातसडीचा तांदूळ, मुरलेल्या लोणच्यासारखे आज्जीचे हात. बास.. इतकंच साहित्य! आणि हो! सगळ्यात महत्त्वाची म्हणजे “चूल” कारण चुलीवरचा मऊभात. ‘करायला चूल आणि खायला मुलं’.

आठवणीतील आजोळच घर आता राहिलं नाही. माणसातला गोडवा आणि निसर्ग मात्र तसाच आहे. असो ! येवा कोकण आपलोच असा..😊🙏🏻

chef
श्रावणी बिनीवाले

How can we help you?