सौर लोणचे

assortment with pickled vegetables e1698061520517

लोणच्याच्या मोठाल्या बरण्या आणि त्यात वर्षभर पुरतील इतकी लोणची! अर्थात एवढी लोणची घालण्याचा काळ लोटून दोन पिढ्या सरल्या! माझ्या आईच्या पिढीतल्या बायकांच्या लाडक्या लोणच्याच्या ब्रँड्स आहेत आणि त्यांची नावेच फक्त इथे अमेरिकेत येईपर्यंत पोचली आहेत, मात्र छान मुरलेल्या लोणच्याच्या फोडीचे अप्रूप काही सरले नाही आहे! हल्लीच मला माझ्या एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मैत्रिणीकडे जायचा योग आला! आमची मैत्री तशी भन्नाटच आहे, म्हणजे ती नुकतीच आजी झालेली, सत्तरी पार असलेली तरतरीत हुशार स्त्री आणि मी चाळीशी अजून गाठायची अशी अधीर गोंधळलेली बाई! तरी तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा तिने चक्क उन्हात ठेवलेल्या तीन चार बरण्या माझ्या पुढ्यात ठेवल्या! भारीतले चीज कसे बारीक नाजूक तुकडे कापून इवल्याश्या बशीत घेऊन सावर-डो (sourdough) वगैरे पावांसोबत खायचे असते, किंवा क्रॅकर (crackers) सोबत, काहीसे तसेच सगळे तिने मस्त मांडले आणि इवलासा चमचा दिला, म्हणाली आता ही सगळी लोणची बघ चाखून आणि जी आवडतील ती घेऊन जा तुझ्यासाठीच लोणची करून ठेवली आहेत! आता लोणची हा समस्त महिला वर्गाचा तसा नाजूक कोपरा! आवडतातच लोणची! त्यात मला भलभलत्या भाज्यांची लोणची वगैरे पुष्कळ आवडतात!

मी पहिली बरणी उघडली, मस्त लिंबाचा रसाळ वास आला! नवेनवे मुरलेपण असलेली ती लोणच्याची फोड, तिच्यावरचे नुकतेच मुरत चाललेले तिखट आणि तिच्या नाजूक पिवळ्या सालीवर मोहोरीचे अलवार ठिबके!

मी छोटासा घास नुसताच तोंडात घातला आणि स्वर्ग सुख! इतके मस्त लोणचे होते! मी वेडावून गेले अगदी!

परत दुसरी बरणी आणि त्यात देखील लिंबाचे लोणचे मात्र त्यात बर्डस आय चिली दिसत होती अधून मधून आणि किंचित चमकदार गोड वास होता! हे म्हणजे तापात उठवून आई किंवा आजी जो ऊन ऊन मऊ भात भरवत असे, त्यासोबत कोपऱ्यात जी तोंडाला चव यावी म्हणून दिली जाणारी जुनी लिंबाची फोड असे, तशीच हुबेहूब चव! क्षणभर डोळेच भरून आले! किती आठवणी अशा चवीशी बांधलेल्या असतात ना! कुठे लहानपणीचे आजारपण, आणि कुठे आजीची माया आणि त्यातला इवला भाग त्या लोणच्याचा मात्र त्याची आठवण ही अशी!

तिसरी बरणी अधीर होऊन उघडली, त्यात हॅलेपिनो (jalepeno) ह्या मेक्सिकन मिरच्या, लिंबं आणि आले अशी फर्मास त्रयी होती! नाकात त्याचा ओळखीचा ठसका आधी पोचला आणि सोबत पोचला तो मस्त तिखट आंबट सुवास!

तिन्ही लोणची इतकी मस्त होती की जगभरातल्या विषयांवर  गप्पा मारता मारता मी तिन्ही बरण्या फस्त केल्या असत्या! बाकीचे जेवण आहे, तुला फक्त चव बघायची आहे असे तिने बिचारीने वेळोवेळी सांगून माझा काही मोह आवरेना!

ह्या भन्नाट लोणच्यांची अर्थात मला कृती हवीच होती! सर्वात मस्त म्हणजे ह्या तिन्ही लोणच्यांना तेल अजिबात नव्हते! ही सगळी लोणची सूर्याची लोणची, अर्थात तेल विरहित होती!

कृती तिन्ही लोणच्यांची तशी सारखीच! काचेच्या मोठ्या तोंडाच्या बरण्या धुवून उन्हात वाळवून घेणे! हा पहिला अनिवार्य टप्पा! मग लिंबं धुवून पुसून कोरडी करून घेणे आणि त्याचे चार चार फाके करून चतकोर चतकोर फोडी करणे. आतील बिया काढून टाकणे. मिरच्या धुवून पुसून घेणे. आले, हॅलेपिनो देखील पुसून कोरड्या करून घेणे. बर्ड्स आय मिरच्या अक्ख्या घालता येतात. हॅलेपिनोच्या चकत्या किंवा तुकडे छान वाटतात. सगळे एकत्र करून त्यात तिखट, मीठ, मोहिरीची डाळ घालून कालवून बरणीत भरणे. गोड लोणचे करण्यासाठी मीठ, साखर आणि बर्ड आय मिरच्या घालून एकत्र बरणीत भरणे. मिर्ची, आले, लिंबू असे लोणचे करतेवेळी, त्यात मीठ, लिंबूरस,मोहोरीची डाळ असे एकत्र करून बरणीत भरणे.

इथवरचे  सगळे टप्पे साधारण सोप्पे आहेत. मग पुढे बरणी बंद करतेवेळी त्याचे तोंड स्वच्छ पुसून कोरडे करायचे आणि त्यावर क्लिंग रॅप प्लास्टिक लावायचे, त्यावर झाकण लावून एका तसराळ्यात किंवा खोलगट ताटलीत पाणी घेऊन त्यात ह्या बरण्या ठेवून सर्व कडक उन्हात ठेऊन द्यायचे. दिवसाआड थोडे मीठ आणि साखर ह्या लोणच्यात घालत राहायची पहिले पाच एक दिवस. मग एकदा त्याला रस सुटायला लागला की रोज थोडे हलवून ठेऊन द्यायचे. दहा दिवस सलग कडक ऊन पाच ते सहा तास लागले की झाले लोणचे तयार! असे हे लोणचे बाहेर दोन महिने तर फ्रीजमध्ये साधारण वर्षभर टिकते!

ब्रेड, थेपला, थालीपीठ, भाकरी, पोळी, नान, कशाहीसोबत  खाता येते! अमेरिकन क्रॅकर, मराठी वरण भात, किंवा तत्सम कोणत्याही पदार्थासोबत ही लोणची छान लागतात!

अशी ही वर्षभर टिकणारी, बिन तेलाची, अतिशय चविष्ट लोणची! मला ह्या लोणच्याचे अप्रूप ह्याही करता आहे की, अमेरिकेत काही भागांत प्रचंड ऊन असते तर काही ठिकाणी अगदीच लोणच्यासारखे, थोडेसे! तरी ह्यातील प्रत्येक प्रदेशात हे लोणचे करणे सहज शक्य आहे! अगदी मिशिगन, शिकागो पासून फ्लोरिडा पर्यंत कुठेही!

ह्याहून कमाल म्हणजे ह्यातील सगळे जिन्नस साध्याशा अमेरिकन वाण सामानाच्या दुकानात मिळणारे आहेत!

जसे आपण सगळे इथे येऊन अमेरिकन जगण्यात मुरलो आहोत, तसेच आपल्या सगळ्यांनी घातलेली ही अमेरिकन सौर लोणची छान मुरू देत!

chef
Team BMM2024

How can we help you?