बदाम पुरी

badam puri

साहित्य:

  • दोन वाटी मैदा
  • अर्धा वाटी दूध
  • दोन चमचे कडकडीत गरम केलेले साजूक तूप
  • दोन चमचे बदामाची पावडर
  • तळण्यासाठी साजूक तूप
  • दोन वाट्या साखर
  • चवीनुसार केशर
  • तीन चार वेलदोडे
  • बदाम, पिस्त्याचे उभे उभे काप
  • कृती:

    दोन वाटी मैदा घेऊन त्यात चार चमचे बदामाची पावडर घालावी आणि त्यात चिमूटभर मीठ घालावे. बदाम पावडर optional आहे.

    मोहनासाठी दोन चमचे कडकडीत गरम केलेले साजूक तूप मैद्यावर घालावे आणि छान कालवून दुधात घट्ट कणीक मळावी. अर्ध्या तासानंतर छोटे गोळे करावेत. छोटी पुरी लाटून त्यावर बोटाने थोडे तूप लावावे आणि अर्धा घडी घालावी. मग पुन्हा थोडेसे तूप लावून एक घडी घालावी. असे पोळी करताना त्रिकोण करतो तसे करावे. त्रिकोणाच्या बाजूंवर किंचित लाटणे फिरवून थोडेसे curve करावे. आकार छान येतो. पुरी फार फुगू नये म्हणून त्रिकोण लाटल्यावर त्यावर रेषा कराव्यात.

    नंतर एका कढईत तूप घ्यावं . ते चांगले गरम झाले की,मध्यम आचेवर बदामी रंगावर पुऱ्या तळाव्यात. बाजूला दुसऱ्या गॅसवर साखरेचा एकतारी पाक करून घ्यावा. त्यात वेलची केशर घालावे.

    पाक गार झाल्यावर तळलेल्या त्रिकोणी पुर्‍या पाकात थोडवेळ बुडवून ठेवाव्यात (पाच मिनिटं). नंतर चिमट्याच्या सहाय्याने पुऱ्या पाकातून काढून, चांगल्या निथळून ताटात ठेवाव्यात. पाक ओला असतानाच बदाम पिस्त्याचे उभे काप लावावेत. खूप छान दिसतं. काप उभे आणि जाडसर असले म्हणजे छान दिसतात. वरून एक थेंब पाक टाकला की चिकटतात. चांगल्या गार झाल्यावर आणि पाक वाळल्यावर बदाम पुऱ्या डब्यात भरून ठेवताव्यात.

    chef
    प्रियांका तेग्गी