पेढा

traditional azerbaijan pastries e1698061540531

दहावीचा निकाल हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला अगदी स्पष्ट आठवणारा टप्पा असतो! म्हणजे ते तेव्हा पडलेले मार्क, हातात पडलेले मार्कशीट आणि त्याचबरोबर तोंडात गोड विरघळणारा पेढा! त्या पेढ्याची चव इतकी डोक्यात फिट्ट बसलेली असते की, आनंद, सुयश म्हणजे पेढा हे समीकरण अगदी मनाशी पक्के होऊन जाते!

बारावी होईस्तोवर बाकी सगळ्या कौतूकासोबत पेढा कोणत्या हलवायाच्या दुकानातून आणायचा हेही आपले ठरलेले असते! पुढे साखरपुडा, लग्न, सण, समारंभ, आपण पेढे खास विकत आणून खात राहतो!

अमेरिकेत स्थायिक होईस्तो काय काय मागे राहून गेलं हे पुरेसे समजले नसते! मात्र इथल्या कोणत्याही परीक्षेत ढीगभर मार्क पडले म्हणून शॅम्पेन वगैरे उघडली तरी त्या गोडसर पेढ्यात जेवढा आनंद मावे, तो काही ही पूर्ण बाटली रिचवून देखील सापडत नाही तो नाहीच! पुढे कधी इंडियन स्टोरच्या कृपेने फ्रोझन पेढे किंवा तत्सम मिळत राहते कुठे कुठे मात्र आपल्या गावचा, आपल्या लहानपणीच्या घराजवळच्या हलवायाच्या पेढा जो आपल्या आयुष्यातून जातो तो कायमचाच!
भले ही गत आत्ताच्या काळाची असेल तर पन्नास साठ वर्षांपूर्वी आलेल्या पिढीचे काय बरं झालं असेल?
मात्र त्या पिढीची गंमत हीच की ही मंडळी हार काही केल्या मानत नव्हती! पेढे नाहीत तर केक किंवा कुकी असला पळपुटा विचार देखील कधी केला नाही बहुदा ह्या लोकांनी! माझ्या ज्या लाडक्या काकी आणि मावश्या आहेत इथल्या त्यांचा हा किस्सा!

दरवर्षी आमच्या गणपतीला आमच्या काकी पेढ्यांचा नैवद्य करतात, आणि गंमत म्हणजे एक डझन वगैरे किंवा एक पौंड वगैरे नाही बरं, तर त्या दिवशी मंडळाच्या गणपतीचे जेवढी मंडळी दर्शन करायला येतील, तेवढ्या सगळ्यांना पुरून उरतील इतक्या पेढ्यांचा! म्हणजे पंधराशे पेढे तर सहज करणे आले!
त्यांचा सगळ्या मित्र मैत्रिणींनाचा एक चमू आहे! ही सगळी मंडळी मिळून दर वर्षी हा मोठाच उपक्रम हाती घेतात! मागल्या वर्षी त्यांनी मोठ्या मनाने आम्हा नवशिक्या पोरींना देखील बोलावून घेतलं!

आम्ही घरून काही आणून का असे विचारले तर म्हणाल्या फार काही नकोय, फक्त जमली तर कुकरची शिट्टी घेऊन या! ह्या अजब मागणीचा विचार करत काकांचे घर गाठले!
वाटलं आता मावा कितपत लागतो ह्या एवढ्या पेढ्यांना, साखर किती कोणास ठाऊक! म्हणजे जी गोष्ट केवळ हलवाई बनवतो आणि आपण फक्त पाव किलो, एक किलो असे सांगून घरी घेऊन येत होतो आयुष्यभर ती गोष्ट बनवायची कशी आणि तेही इथे! भारतापासून इतक्या लांब! आणि त्यात फक्त कुकरची शिट्टी कशी वापरतात!
काहीच उमगेना! मग तिथे पोचल्यावर वेगळीच तयारी दिसली! मावा कुठेच नव्हता! होते ते रिकॉटा चीजचे भरपूर डबे, दुधाची भुकटी, बटरचे ढीग, साखर आणि वेलदोडा, केसर!
तूप नाही, मावा नाही, सुरु काय आहे इथे! मात्र अमेरिकन वाण सामानाचा समान धागा पकडून इथे देखील ह्या ज्येष्ठ मंडळींनी किमया केली होतीच!
अमेरिकन वाण सामानातले तसे ओळखीचे पदार्थ एकत्र करून ही मंडळी पेढा कसा काय करणार हे शिकायला मजा येणार होती! अर्थात त्या शिट्टीचे काय होणार होते, अजून गूढ होतेच!

इकडे आम्ही लिंबू टिंबू असल्याने, रिकॉटा चीजचे डबे उघडणे, साखर मोजे ठेवणे असली कामे मिळाली! मुख्य भार दोन मावश्यांनी सांभाळला होता! मोठ्याल्या दोन कढाया होत्या, त्यात आधी बिन मिठाचे बटर गेले, त्यानंतर रिकॉटा चीज आणि मग हे मिश्रण ढवळायला सुरवात झाली! त्यानंतर दुधाची भुकटी गेली आणि काय सुरु होणार आहे ते कळेना! अचानक आम्हा तरुण पोरींना बोलावून ‘ढवळा ग आता’ असा आदेश मिळाला आणि मग समजलं काय प्रकरण आहे हे!हात भरून येतील इतपत नाही तरी पुष्कळ ढवळल्यानंतर हळू हळू आधी बटर विरघळले, त्यात दुधाची भुकटी शोषली गेली आणि आणि चीज देखील आपला अवतार बदलू लागले! त्यात भर पडली साखरेची! पुन्हा आटीव होत चाललेले हे मिश्रण पाघळू लागले! साखर त्या मिश्रणाच्या रंध्रारंध्रात शोषली जाऊ लागली आणि पुन्हा एकवार मिश्रण ढवळत ढवळत घट्टसर होऊ लागले! अचानक त्यात वेलदोडा पूड पडली आणि अख्ख्या स्वयंपाकघराचा नूरच पालटला! एक चिरपरिचित घमघमाट घरभर साठून राहिला! हलवाई आठवला लहानपणीचा आणि तिथला तो ओशट गोडसर वास, त्याची खूप वर्षांनी उजळणी झाली!

हाच तर तो वास! हळूहळू तो खमंग गोडसर वास पक्का होऊ लागला! हे शुभ्र पांढरे मिश्रण आता फिक्के बदामी रंगाचे होऊ लागले. दुसरीकडे केसरचे नाजूक तंतू घेऊन ते हलके परतले कोरडेच. मिक्रोवेव्ह केले तरी चालतात. छान सुवासिक झाल्यावर हाताने चुरून त्याची बारीक पूड केली गेली! हाताला केशरी गंध बिलगला तो दोन तीन दिवस तसाच राहिला! त्या मिश्रणात कोमट दूध पडले! क्षणार्धात दूध त्याचे पांढरेपण सोडून गर्द केशरी झाले!
दुधात केशर खलून घेतले आणि त्याचे काही थेंब आपल्या बदामी पांढऱ्या पेढ्याच्या मिश्रणात टाकले! चुरचुरत ते मिश्रण केशरी रंगात माखले!
हळूहळू संपूर्ण मिश्रणाचा रंग केशरी झाला आणि त्याच्या भविष्याची चाहूल लागली! अखेर हे मिश्रण खरोखर पेढा होणारे हे समजू लागले.
करत करत आता ढवळणारे हात थकू लागले, तरी समोर कढईतली किमया बघून मन हरखून गेले होतेच!
मिश्रण कढईपासून आता हळूहळू सुटू लागले! काढायला तुपाचा ओशटपणा जाणवू लागला! मिश्रण लगदा होऊन पुढे गोळा होऊ लागले! आता हा मोठा गोळा गॅसवरून काढून ठेवला! त्यात थोडी सुकामेव्याची पूड मिसळली, आणि मिश्रण होता होईतो कोमट झाले असा अंदाज घेत मोठाल्या बेकिंग ट्रे वर पार्चमेंट पेपर अंथरून घेतला!
मग तीन चार लोक लागले त्या गोळ्याचे बारीकसे उंडे करायला लागले आणि हाताला तूप लावून, थोडेसे चपटे करत हे गोळे अगदी मिठाईच्या दुकानात असतात तसे रांगेत लावून ठेवायला लागले!
आता मनात प्रश्न होताच! समोरचा पदार्थ निश्चित पेढा होता मात्र अजून कुकरच्या शिट्टीचा कशात उपयोग झाला नव्हता! मनात प्रश्न तयार होईतो, काका आले आणि शिट्टीने प्रत्येक पेढ्यावर गोलसर छाप पाडला! आणि मावशीने त्यात सुकामेवा पेरायला सुरवात केली! काही पेढ्यावर किंचित केसर तंतू, काहींवर छानसा पिस्ता तर काही ओळींवर ओळखीची चारोळी! करत करत एक ट्रे सजला! पेढे अजून पुष्कळ लागणार होते! पुढचे रिकॉटा चीजचे डबे परत कढईत पडले होतेच, बटर देखील होते आणि पुन्हा साखर सज्ज होती!

त्या दिवशी तब्ब्ल १५०० पेढे करताना ही प्रक्रिया खूपदा जवळून बघायला मिळाली! खूप धमाल करत जुनी मराठी गाणी ऐकत अगदी हलवाई लाजेल इतके सुरेख पेढे केले आणि तेही फक्त अमेरिकन दुकानात मिळणाऱ्या वस्तू वापरून!
आता त्या मूळ कृतीचा उपयोग पुढील अनेक पदार्थ करायला वापरता येतो! साखर दूध घ्यायच्या ऐवजी आटीव दूध/कंडेन्सड मिल्क वापरता येते, केसर घातले नाही आणि अधिक ढवळले तर कंदी पेढे होऊ शकतात, तसेच मावा कचोरी, माव्याच्या पोळ्या किंवा इतर माव्यापासून बनणाऱ्या मिठाया सगळ्या ह्या कृतीतून समजून घेता येतात! अर्थात प्रमाण कमी घेतले तर घरगुती वापरासाठी एखाद रिकॉटा चीजचा डबा पुरेसा होतो घरच्या कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेत वापरायला जर पेढे हवे असतील तर! तसेच एक निराळे समाधान लाभते, आपल्याला ज्या गोष्टी करायला लागतील ह्याची कधी कल्पना देखील केली नव्हती त्या गोष्टी शिकून, आत्मसात करून!

आता आपल्या मनातला आनंद आपण स्वतःच्या स्वयंपाक घरातच निर्माण करू शकतो ही फारच सकारात्मक ऊर्जा देऊन जाणारी भावना निश्चित आहे!

प्राजक्ता पाडगांवकर

chef
Team BMM2024

How can we help you?