खीर-फळं

Keer falae

साहित्य:

खीर:

  • रवा, तुप, दूध, नारळाचं दूध, साखर (साखरेचं प्रमाण कंडेन्स्ड मिल्क वापरणार असाल तर त्यावर कमी जास्त), वेलची पावडर.
फळ :
  • कणीक, कणकेच्या निम्मा गुळ, चिमुटभर मीठ.
  • (कंडेन्स्ड मिल्क, सुका मेवा, केशर आवडीनुसार).

कृती

प्रथम गूळ किसून गूळ बुडेल इतपत पाणी घालून, मिनिटभर Microwave करावे.  तयार झालेलं गुळाचं पाणी (गूळ-सिरप) गाळून घ्यावे. कणकेत चिमुटभर मीठ घालून गुळाच्या पाण्यात थोडी घट्टसर कणीक भिजवावी. आता रव्याची खीर होईपर्यंत निदान १० ते १५ मिनिटे कणीक झाकून ठेवावी. रवा तुपावर छान भाजून घेऊन थोडं पाणी घालावं, म्हणजे रवा छान शिजायला मदत होते. मग दूध घालून साखर व कंडेन्स्ड मिल्क घालावे. रव्याच्या खिरीला एक उकळी आल्यावर नारळाचे दूध घालून गॅस बंद करावा. आता कणीक छान मुरली असेल. त्याच्या पोळ्या लाटून शंकरपाळीचे आकार द्यावे की फळं तयार. एकीकडे पाणी गरम करून, चांगले तापल्यावर पण उकळी येण्यापूर्वी कणकेची फळं पाण्यात सोडावीत. शिजल्यावर फळं वर येतात. मग ती फक्त फळं (पाणी नाही), रव्याच्या खि‍रीत सोडावीत आणि छान एक उकळी घ्यावी म्हणजे समरस होतात. अशी खीर-फळं तयार. आवडी प्रमाणे खि‍रीत स्वादासाठी वेलची पूड, रंगा साठी केशर, सुका मेवा बारीक करून घालावा. 

तळ टीप

  • गुळाचं प्रमाण गुळाच्या गोडी वर आणि आपल्या आवडी प्रमाणे कमी जास्त करता येईल. परंतु कणीक चवीला गोड लागायला हवी.
  • वेलचीचा स्वादाऐवजी वेगळा स्वाद म्हणून दालचिनी पावडर वापरू शकतो.
  • मूळ चवीत नारळाचे दूध आणि गूळ ह्यांचा स्वाद आहे.
  • कंडेन्स्ड मिल्क अगदीच पर्यायी आहे.
  • खीर-फळा करता रव्याची खीर मध्यम पातळ असावी. कारण मुळात ती पटकन आळते किंवा घट्ट होते आणि फळांमुळे अजून घट्टसर होते तसा अंदाज घ्यावा.
  • chef
    श्रावणी बिनीवाले, कॅलिफोर्निया

    How can we help you?