आपल्या सगळ्यांचेच लहानपणीचे काही खास चवीचे पदार्थ असतात. ज्याची चव कायम आपल्या जीभेवर तरळत असते. मग ते आपल्या आई, मावशी, काकु, आत्या किंवा आजीचे खास पदार्थ असतील किंवा कधी कधी तर मित्रमैत्रिंणींच्या शाळेतील डब्यातील पदार्थ. आम्ही लहानपणी शाळेतील डबाही एकत्र ऐकमेकांना देवून खात असू. त्याकाळी माझी एक मैत्रिण कायम डब्यात ब्रेडजॅमचे सॅण्डविच आणत असे. त्याचे मला प्रचंड कौतुक कारण माझ्या आईला बेकरीतील पदार्थ घरी आणलेले आवडत नसत. आणि जॅमपेक्षा घरी बनविलेला साखरअंबा, गोडांबा, मोरवळा किंवा फार क्वचित पाइनॅपलचा गर काढून केलेला जॅमसदृश्य पदार्थ ती आम्हाला पोळीला लावून देत असे. आज मला आईची आम्हाला घरचेच पदार्थ खाऊ घालण्यामागची तळमळ कळते. पण लहानपणी ब्रेड फक्त आजारी पडल्यावरच खायला मिळतो म्हणून आजारी पडावे वाटे😊.
माझ्या मोठ्या मावशीच्या हाताला खुप छान चव होती. तिच्या जिवंत फोडणीच्या आमटीची चव तर कितीही वेळा प्रयत्न करुन मला जमली नाही. जिवंत फोडणी म्हणजे पळीत तेल घेऊन ती गॅसवर धरायची. आणि मग त्यात जीरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता थोडा तडतडून आग पकडतो, मग तशीच पळी फोडणीसकट आमटीत टाकायची😊. तो तिचा आगीशी खेळ पहाणे त्या लहान वयात फार भारी वाटे😊.
आम्ही मराठवाड्यातील, त्यामुळे त्याकाळी उन्हाळ्यात फार कमी भाज्या मिळत. जवळजवळ दररोज आंब्याचा रस असल्यामुळे आम्हा मुलांना भाजीची अडचण नसे. पण मोठ्यांसाठी मात्र खास मग ठेवणीतल्या भाज्या होत. जसे आमच्याकडे शेत असल्यामुळे हरबरयाची भाजी वाळवून ठेवली जाई आणि ती ह्याकाळात होई. मुग, हरबरा डाळीचे सांडगे केले जात, कुरडईच्या चुरयाची कांदा घालून भाजी होई. डुबूकवडी म्हणजेच मसाल्याच्या कटात बेसणाच्या पीठाचे कांदा न घालता भजे सोडत आणि त्या कटातच ते शिजवत. मी एकदा इथे अमेरिकेत ऑफीसला डब्यात डुबूकवडी नेली होती. मसाल्याच्या सुवासाने माझ्या एका फिजी मैत्रिणीला ती खाण्याची इच्छा झाली. तिने ती खाल्ली आणि मला म्हणाली ‘This is so good, it tastes like a shrimp curry ‘😊.
माझ्या मावशीचा असाच एक पदार्थ जो मला तेव्हा खूप आवडायचा तो म्हणजे ‘लबाड वांगी’😊. त्या गंमतीशीर नावामुळे कदाचित हा पदार्थ जास्त लक्षात राहीला. नंतर कळले की काहीजण ह्याच भाजीला उंबराची किंवा मोदकाची भाजी पण म्हणतात. हा तसा वेळखाऊ पदार्थ असल्याने आई तो शक्यतो सुट्टीच्या दिवशी बनवे. मी आपल्या वेबसाईटवर ह्याच पदार्थाची थोडक्यात रेसिपी दिलेली आहे. खरेतर ह्यातील जो रस्सा आहे तो तुम्ही भरलीवांगी करतांना जसा करतात अगदी तसाच करायचा. त्यात वांग्याऐवजी बेसनाचे आत सारण भरलेले मोदक सोडायचे आणि खरे वांगी त्यात नसल्यामुळे त्याला लबाडवांगी म्हणतात😊.