मार्च महिना, चैत्रगौरीचे दिवस, मी माझ्या एका परिचितांकडे गेले तर काकींनी सहज विचारलं, “पन्हं घेशील?”
पन्ह्याचे नाव ऐकताच मी भलतीच खूष झाले, “हो अगदीच आवडेल की”
आतून दोन सुबक पेल्यांतून त्या फिक्कट पिवळं, हलके केशरी दैवी पेय घेऊन आल्या! मी सावकाश पेला नाकापाशी नेला, एखाद्या निष्णात (sommelier) सोमॉलयेने अतिशय मुरलेली वाईन मला खास पेश केली असावी अशा अविर्भावात मी सावकाश ते द्रव्य हलवले, एक खोल श्वास भरून ती चव माझ्या आत मुरू दिली. हलकी गुळाची खमंग चव, मध्येच केशर, त्यावर स्वार वेलचीची अगदी तेजस्वी छटा, कैरीच्या खास आंबट छटा; एकाद्या वाईनच्या जशा नोट्स कळाव्या तशी गत! खरोखर आपल्याला आपल्या पारंपरिक पेयांचे असेच कौतुक असायला हवे!
मनाशी हा संवाद सुरु होता, ओठ पेल्याला लावले आणि लहानपणीचा हावरटपणा झट्क्यात अंगात शिरला! एका दमात मी तो पेला रिकामा केला! काय कमाल चव होती, अगदी आजीच्या हातच्या पन्ह्याची आठवण झाली!
तोवर काकी काकांची मिश्किल नजर माझ्यावर रोखलेली आहे हेच ध्यानात आले नाही! पेला रिकामा झालेला बघून काकी काही न बोलताच आत गेल्या आणि अजून पन्ह घेऊन आल्या! दोन पेले पन्हं रिचवून मी जरा ओशाळून थांबले तेव्हा भलताच प्रश्न समोर आला, काकांनी विचारलं, “पन्ह आवडलं ना? सांग काय काय घातलं आहे पन्ह्यात?”
हा कसला प्रश्न म्हणून मी अगदी बेफिकिरीने उत्तर दिलं, “अर्थात कैरी, गूळ, वेलदोडे…” “चूक! साफ चूक!” काकी खुशाल हसून म्हणाल्या! “पदार्थ पूर्ण चुकले आहेत? कसं शक्य आहे?” माझी आता चांगलीच तंतरली, “मला भास होत आहेत की काय चवींचे, पदार्थांचे!” “गोंधळात पडलीस ना? वेलकम टू अमेरिका! हे खास अमेरिकन मराठी पन्ह आहे!”
काकींनी सुरवात केली आणि आपण एका नव्या अद्भुत गोष्टीचे साक्षीदार होत आहोत हे तात्काळ जाणवले!
काका काकी हे १९६० किंवा त्याहून आधी भारतातून अमेरिकेत आलेल्या पिढीचे! त्या काळात भारतीय वाणसामानाची दुकाने फारशी नव्हती, आणि होती त्यात सर्व जिन्नस मिळतील ह्याची खात्री नव्हती! आजच्यासारखे भारतीय पदार्थ अमेरिकाभर उपलब्ध नसत, मात्र आपले पारंपरिक पदार्थ, घरच्या चवींची आठवण, आणि हाताशी असलेले तुटपुंजे पदार्थ ह्यातून पूर्ण नवीन पाककृती विकसित झाल्या, आणि अमेरिकाभर पसरल्या!
ह्यातलाच एक अविष्कार म्हणजे हे पन्हं!
चवीला, दिसायला शंभर टक्के पन्हं वाटणारं हे पेय मात्र ह्यात कैरी, गूळ अजिबात नाही! ह्यात आहे ऍपल सॉस, अर्थात सफरचंदाचा गर, त्यात भर आहे एका खास लेमोनेड पावडरची, वर त्यात आहे साखर आणि अननसाचा रस! मग केशर, वेलचीपूड आहेच! मी हे ऐकून सर्द झाले! आपली जीभ, डोळे सपशेल फसले की! काय तर म्हणे पन्ह्याच्या नोट्स आणि काय न काय!
सगळेच अंदाज साफ चुकले!
ह्यात माझ्या नाकाची किंवा जिभेची चूक नसून हा नवा तरी हुबेहूब पारंपरिक चवीचा पदार्थ करणाऱ्या अमेरिकन मराठी आज्यांची कमाल होती! त्यांनी चक्क क्रोगर, कॉस्टको अशा रोजच्या अमेरिकन वाणसामानाच्या दुकानातील मिळणारे पदार्थ एकत्रित करून, पूर्ण भारतीय पाककृती तयार करण्याचं शिवधनुष्य पेललं होतं.
पुढे गप्पांच्या ओघात हे देखील समजलं कि असा एखाद पदार्थ नसून अनेक पदार्थ आहेत, प्रत्येक पदार्थात आपल्या कल्पनेच्या पलीकडले घटक पदार्थ आहेत, मात्र चव हुबेहूब आपल्या पदार्थांसारखी! केशरी पेढे, कलाकंद, बेळगावी कुंदा, पुरण पोळी, साटोऱ्या आणि बरेच काही!
सामिष पदार्थांची यादी त्याहून निराळी! आहे की नाही काही खास?
ह्या अमेरिकन मराठी पदार्थांत?
न जाणो पुढे जाऊन इथे येणाऱ्या प्रत्येक मुलामुलीस हा असला ग्रंथ उपयुक्त ठरेल, जेवण बनवायला , अमेरिकन मराठी आईच्या हातचं करून खायला! मराठी पाककलेचा एक नवाच अध्याय इथे अमेरिकेत सुरु होत आहे हे मात्र निश्चित!
~प्राजक्ता पाडगांवकर