कितीही छान जेवण झालं, अगदी वेगळ्या प्रकारचं, चवीचं जेवण झालं तरी आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला थोडासा भात हवासा वाटतोच…आणि मग तो अश्या प्रकारचा असेल तर – क्या बात है!!! हल्ली डाएट मुळे भातावर संक्रांत आली आहे, बरीच मत मतांतरे देखील दिसून येतात. पण सारांशाने असं वाटतं की, हे सगळं काही निसर्गनिर्मित आहे, शरीराला, मनाला याची आवश्यकता असतेच…एकच पाळावं ते म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता आपल्या जिभेचे चोजले यथायोग्य पुरवावे आणि आनंदाने, चवीचवीने खात राहावे.
१. तूप मीठ भात
आपल्या घरात नवीन छोट्या बाळाचं आगमन होतं आणि मग बाळाच्या रसपूर्ण जेवणाची सुरुवात “उष्टावण” या छोट्याश्या बरेचदा घरगुती कार्यक्रमाने होते. पहिला घास बाळाला भरवला जातो तो तूप मीठ भाताचा. आयुष्यातल्या चवीची ओळख ही अशी होते आणि मग यातूनच चवीनं जेवणार एक जीवन आकाराला येतं.
२. वरण भात तूप लिंबू मीठ
आपल्या महाराष्ट्रीयन जेवणाचा राजा म्हणजे – वरण भात तूप लिंबू मीठ – जगात कुठेही कितीही खाऊन आलात, कितीही चवींचा अनुभव घेतलात तरी पुन्हा घरी परतल्यावर हवासा वाटतो आणि मनाला आणि जीवालाही तृप्त करतो तो म्हणजे वरण भात तूप लिंबू मीठ. असा हा आपल्या पारंपरिक जेवणाचा, नैवेद्याचा अविभाज्य राजमान्य भाग.
३. आमटी भात
यामध्ये सर्वमान्य तुरीच्या डाळीची आमटी तर असतेच, पण इतर डाळींच्या म्हणजेच, मुगाची, मसुराची, हरभरा डाळीची, स्वतंत्र किंवा एकत्र आमटी, उडदाच्या डाळीचं घुटं, आई, आजी, आत्या, काकू, मामी, मावशी, प्रत्येकीची आमटी करण्याची पद्धत वेगळी आणि प्रत्येक आमटी तितकीच चविष्ट देखील असते.
४. पिठलं भात
या पिठलं भाताचं नातं मला स्वतःला जरा भावुक वाटतं. केवळ मीठ, मिरचीची हलकी फोडणी, डाळीचं पीठ आणि पाणी, फारसं काही नसताना देखील अत्यंत चविष्ट आणि केवळ दुपारच्या बाराची नव्हे तर रात्री अपरात्री देखील आलेल्या पाहुण्याची तृप्तीने भूक भागवणार असा हा पिठलं भात. कधी कांद्याचं पिठलं, तर कधी झुणका…कधी पातळ पिठलं, तर कधी घट्ट, सजवायला नारळ, कोथिंबीर, कढीपत्ता असेल तर उत्तमच, पण नसलं तरीही ठीक. साधं पिठलं, वाफाळलेला मऊ भात, आणि किंचितशी तुपाची धार…कधी डाळीच्या पिठाचं, कधी मुगाचं, तुरीचं, तर कधी कुळथाचं – पिठलं भात तो पिठलं भात.
५. मेतकूट भात
अहाहा, आईनी घरी तयार केलेलं मेतकूट, कणीचा मऊ पातळ भात आणि त्यावर घरचं साजूक तूप, एक अप्रतिम चव आणि समाधान देणारा हा मेतकूट भात, बरेचदा या मेतकूट भातात मला आजीची माया दिसते. कोकणात हाच मेतकूट भात खिमट म्हणून ओळखला जातो, सकाळी सकाळी वाडगाभर खिमट खावं आणि ताकदीनं कामाला बाहेर पडावं. ताठ कणा, सुरकुतलेला पण तजेलदार चेहरा, किंचीतश्या थरथरत्या हातानी, ओथंबलेल्या प्रेमळ नजरेनी खाऊ घालणारी आजी म्हणजे मायेचा मेतकूट भात.
६. पातळ भाजी आणि भात
माझ्यासकट बऱ्याच जणांना पातळ भाजी आणि भात अगदी मनापासून आवडतो. साहजिकच पातळ भाजी म्हणजे हिरवी पालेभाजी, मेथी, ताकातला पालक, चाकवत, मायाळू, करडई, अंबाडी…सोबत गरम भात आणि तुपाची धार. जीवनसत्त्वे आणि खनिजे जसे की व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम यांनी समृद्ध असलेल्या या पालेभाज्या गरम भातासोबत एक वेगळाच आस्वाद देऊन जातात.
७. दही भात
आत्तापर्यंत भाताचे सगळे प्रकार हे गरम भाताबरोबर खाल्ले…पण मनाला आणि शरीराला थंडावा देणारा दही भात हा एक अवलियाच. माझ्या सासूबाई त्याला भरपेट जेवणानंतरचे प्लास्टर असं म्हणायच्या – साधा दही भात (पण त्यात किंचित दूधही न विसरता घालायचं), सायीच्या दह्याचा दही भात, चुर्रर्रर्र वाजणाऱ्या फोडणीचा दही भात, टोमॅटो – काकडी – गाजर – डाळिंबाचे दाणे घातलेला दाक्षिणात्य दही भात, चवीला थोडेसे खारे दाणे घालून केलेला दही भात, मनाला, पोटाला शांतात देणारा आपुलकीचा दही भात.
पूर्वा धारप