बेसन,तिखट,मीठ एकत्र करुन पाणी टाकुन घट्ट गोळा बनवून घ्यावा.
खसखस,खोबरे,बारिक चिरलेला कांदा सर्व निट परतवुन थंड करावे. त्यात बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर, धनाजिरा पावडर व किंचीत गोडा मसाला टाकावा. चवीपुरते मीठ आणि चिमूटभर साखर टाकून सर्व छान एकत्र करावे.
बेसनाच्या छोट्या पुऱ्या लाटून त्यात हे सारण भरुन मोदकासारखा आकार द्यावा.
एक मोठा कांदा चिरुन तो थोड्या तेलात चांगला खरपूस परतावा, त्यात खोबरयाचा किस टाकून तेही परतावे. गार झाल्यावर भरपूर कोथिंबीर (कोवळ्या काड्यांसकट) आणि तीन/चार लसुण पाकळ्या घालून छान बारीक वाटून घ्यावे. एका भांड्यात तेल तापवून त्यात हे वाटण छान परतावे, नंतर त्यात काळा मसाला किंवा गोडा मसाला, चवीनुसार मीठ आणि तिखट टाकून छान परतावे. त्यात हळद आणि गरम पाणी घालावे म्हणजे छान तर्री येते. रस्सा फार पातळ किंवा खुप घट्ट करु नये कारण वांगी शिजतांना तो घट्ट होतो. उकळी आली की त्यात बेसनाची वांगी टाकून ते छान शिजवून घ्यावे . ही भाजी वाढताना बरोबर कांदा आणि लिंबू वाढावे. भाकरी, पोळी किंवा भात कशाबरोबरही खूप छान लागते.
आपल्याकडे बारा महिने वांगी मिळतात तरीही एकदा तरी ‘लबाडवांगी’ नक्की करुन बघा.
सुषमा घुगे आंबेकर