मी नटवलेल्या मदनिका – सुधीर

कॉकटेल ड्रिंक हे सुंदर स्त्री सारखे असते. यात प्रत्येकीची स्वतःची style आहे. प्रत्येकीचे स्वतःचे सौन्दर्य आणि अदा वेगवेगळी. मोहक पणा वेगळा. कोणाला कोण आवडेल सांगता येत नाही. ते पहिलं प्रेम कोणाशी जडेल त्याचा अंदाज घेता येणार नाही. तसंच कोणतं कॉकटेल कोणाला पटकन आवडेल हे सांगता येत नाही.

स्त्री जशी आरशासमोर बसून, ड्रेसिंग ड्रॉवर मधल्या गोष्टी वापरून शृंगार करते. तशा या कॉकटेल्स घरातल्या बार मधून सुंदर होऊन बाहेर येतात. या सौन्दर्य प्रसाधनाच्या ड्रेसर ड्रॉवर मध्ये सगळ्या गोष्टी असतात. त्यात रम, जिन, व्हिस्की, वोडका, taquila हे अगदी बेसिक. ते असायलाच पाहिजे. लाईम जुस, सोडा, साखर सुद्धा प्रत्येकीच्या खणात. त्यात ड्राय व्हरमुथ, स्वीट व्हरमुथ, ट्रिपल सेक हे मात्रं प्रत्येकीच्या आवडी निवडी नुसार. बिटर्स नावाचा शेवटी मारण्याचा ऍरोमॅटिक perfume असतो.

प्रत्येकीला तयार करताना, नटवताना, एकत्र वेळ घालवताना, जो काही स्वभाव आणि अदा लक्षात आली ती अशी.

मार्गारिटामार्गारिटा – ही नेहेमीचीच, पण तेव्हढीच नेहेमी आवडणारी. हिला सजवताना मला सारखी त्या मराठी रोमँटिक गाण्याची आठवण येते. “तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी, बहरांच्या बाहूंची, तू तेंव्हा तशी”. हि नेहेमीची, तेंव्हा पण आवडलेली, आणि आता पण आवडलेली. या गाण्याप्रमाणेच . एक तर ही मार्गारिटा ग्लासच्या आकाराप्रमाणे बाहू पसरून आपली वाट बघत असते. बहरांच्या बाहूंची. त्या गाण्यातल्या “चाफेकळी प्रेमाची” या वाक्याप्रमाणे हिचा ड्रेस चाफेकळीच्या रंगाचा, पांढरा आणि थोडासा त्याला हिरवट पिवळट छटा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे  हिच्या ओठांवर कोशर मिठाची लीप ग्लॉस असते. त्यामुळे ते पातळ ओठ खूपच सुंदर दिसतात, या गाण्यातल्या “तू खट्या मिठ्या ओठांची” या उपमेला हिच्या शिवाय कोण परफेक्ट असणार ? त्या टपोऱ्या हिरव्या लिंबाच्या चकतीकडे बघून ते पण कडवं आठवतं, ते म्हणजे “ती हिरवी कच्ची, खारीच्या ग डोळ्यांची”. तर ही अशी.

Manhattanमॅनहॅटन Manhattan – काही सावळ्या मुली विलक्षण आकर्षक दिसतात, ही तशीच. ह्या ब्राउन रंगाचं सौन्दर्य आणि अदा वेगळीच. सावळ्या रंगाला खुलवणे हे एक वेगळं कला आहे. परंतु माझ्या काही मित्र मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार मला अजून हिला छान नटवता येत नाही. या सर्व ललनांमधली हि नंदिता दास, किंवा चित्रांगदा. वेगळीच चमक हिच्या चेहऱ्यात. शिवाय एक चांगलं आहे. पटकन तयार होते, तपकिरी ड्रेस किंवा साडी असं काहीतरी नेसून लगेच गप्पाना ready. ड्रेसर ड्रॉवर मध्ये सुद्धा हिच्या फारसं काही नसतं आणि हिच्या फार अपेक्षा नाहीत. व्हिस्की, स्वीट व्हरमुथ या गोष्टी अंगावर चढवते आणि झाली ही तयार. पण शेवटचा पर्फुम, बिटर्स मात्र तिचा जीव की प्राण. तो असल्या शिवाय ही कुठे जाणार नाही. त्या पर्फुम मध्ये तिची आयडेंटिटी आहे. म्हणजे नेहेमी पटकन मदतीला असणारी मैत्रीण असते तशी, हिच्यावर डिपेंड राहता येतं.

पिना कोलाडापिना कोलाडा – ही नारळाच्या दुधामुळे चांगलीच गोरी गोमटी आणि गुबगुबीत. खानदानी घरात वाढल्या सारखी. सगळ्या कॉकटेल स्त्रियांमधली ही पक्की कोकणस्थी. कारण मुळातच कोकणी नारळाशी घनिष्ठ नाते आहे. परंतु जसा कोकणस्थांचं मूळ कुठल्या देशातून आलं, हे जसं धड कोणालाच माहिती नाही, तसंच हीच मूळ पोर्टो रिको मध्ये आहे असं म्हणतात, पण नक्की नाही.
खूप गोरी असल्यामुळे हिला ड्रेस करता सगळे ice cream रंग खूप छान दिसतात. orange, मँगो , अननस असे वेगवेगळे रंग तिच्या पसंतीचे. हिचं एक वैशिष्ट्य म्हणजे, तिच्या ड्रेस प्रमाणे तिला वेगवेगळ्या नावाने हाक मारली जाते. ऑरेंज कोलाडा, मँगो कोलाडा, पिना कोलाडा वैगेरे.

माय तायमाय ताय – हिच्या नावातूनच कळतं, की तिला कितीही सजवा, ताई माई अक्का अशीच दिसते. गप्पा पण तशाच. काकू बाई सारख्या. आणि शिवाय पिवळा हा काय रंग झाला ? तो तर साधा आमच्या orange juice चा पण असतो. हिच्या बरोबर असताना सगळा रंगेल पणा मलाच दाखवायला लागतो. चकण्याच्या स्वरूपात. बघा फोटोत. शिवाय ही नुसती बोलायला गोड. म्हणजे अति गोड. पण चवीच्या नावानी शंख . हिला काही लोकं अजून काहीतरी वरून घालून, उदा. रेड सिरप, घालून छान दिसण्याचा प्रयत्नं करतात. पण मुळात पर्सनॅलिटीच अशी, गप्पा सुरु झाल्यावर कळायचं ते कळतच, काही फरक पडत नाही. 

पिंक लेडीपिंक लेडी – हिच्या रुपाकडे बघून का कोणास ठाऊक वपुंचं एक वाक्यं आठवतं “स्त्री ही  वाऱ्याच्या झुळके सारखी असते, पण धरून ठेवता येत नाही”. एखाद्या ओल्या संध्याकाळी हिची भेट होते, आणि आपल्या आयुष्यभर लक्षात रहाते. त्या गुलाबी ड्रेस ला साजेसा चेहर्या वरचा गुलाबीपणा कित्येक वर्ष डोळ्यासमोरून जात नाही. ओठांना कधी कधी डाळिंबाची उपमा देतात. हे हिच्याच वरून आलं. कारण डाळिंबाचं सिरप प्यायल्यामुळे ही इतकी रसाळ. परंतु हिच्या सौन्दर्याचं अजून एक गुपित आहे. कोणी मैत्रिण विचारते “तुझी स्किन इतकी सुंदर कशी काय” आणि ती हळूच कानात सांगते “एग लाव रोज चेहऱ्याला, अंडं”, हिचं पण गुपित तेच आहे. एग व्हाईट.

ब्लू लगूनब्लू लगून – हिच्या तना मनात आणि नावात निळत्व आहे. ब्लु कुरशाव हे हिच्या ड्रेसिंग ड्रॉवर मधलं special मेकअप किट. हिचं closet तिच्या आवडत्या निळ्या कपड्यांनी भरलेलं आहे. वेगवेगळ्या छटांचे निळे रंग. जिच्या नावातच ब्लु लगून आहे तिथे रोमान्स आणि सौन्दर्याचा अभाव कसा असू शकेल ? “निले गगन तले” किंवा “निले निले अंबर पर चांद जब आये” अशा  सदाबहार गाण्यांना सुद्धा जुनं करतील असा फ्रेशनेस हिच्या मध्ये. पण ही थोडी अबोल आहे. अलिप्त. थोडी गूढ. निळ्याशार समुद्राची खोली कुठे तरी आहे. त्यामुळे या अबोल व्यक्तिमत्वाची एक वेगळीच ओढ आहे.

हिची जुळी  बहीण म्हणजे हवाईन ब्लू. हे थोडी रंगानी वेगळी. हवाईन समुद्राचा अक्वा रंग हिच्या मध्ये आलाय कारण हि कायम पायनॅपल जूस पिते, त्यामुळे तिच्या कांतीला एक वेगळाच तजेला आहे. पण दोन्ही बहिणी अशाच, अलिप्त आणि गूढ.

मिमोसामिमोसा : मी नटवलेल्या ललनांमधली हि सगळ्यात उंच. कारण हि शॅम्पेन किंवा वाईन ग्लास हिचा आवडता. मुळात हि वाईन वर खुश असते, पण ग्रेप फ्रुट juice ने हिच्या चेहऱ्यावर लाली येते. या लालीचा रंग लाल नसून अबोली असतो, तो त्यात वाईन किती आहे यावर ठरतो. हीच लाली सूर्यास्ताच्या लालीशी मिळते जुळते. त्यामुळे सूर्यास्ताकडे बघत हिच्याशी गप्पा मारताना, इकडे बघू का तिकडे असा प्रश्नं पडतो. जे काही तिने सोन्याचं कानातलं गळ्यातलं घातलेलं असतं ते तिला खूप शोभून दिसतं.

मोहितो mojitoमोहितो (mojito )  – नावासारखीच मोहात पाडणारी. हसरी, लोभस, संध्याकाळ सुंदर करेल अशी. माझी सगळ्यात आवडती. हिला फार नखरे नाहीत, मिंट सारख्या साध्या खट्याळ विनोदावरून सुद्धा सहज सुंदर हसून जाते. त्यामुळे तिच्या बरोबर एखादी गोष्टं बोलू का नको हा प्रश्नं पडत नाही. नाही आवडला विनोद तर “काहीही बरका” असं म्हणून सोडून देईल. जोडीदाराकडून फार अपेक्षा नाहीत, रुसवे फुगवे नाहीत. मिंट च्या झाडासारखीच ही भरभरून बोलते. मिंट च्या झाडाला जसं फार, पाणी, ऊन, खत वैगेरे लागत नाही तसेच, बोलताना हिला सारखी कॉम्प्लिमेंट्स आणि नाटकी आदराच्या खताची गरज नाही. त्यामुळे गप्पा एखाद्या मैत्रिणीसारख्या होतात. साधं पानांचं design  असलेला ड्रेस. पण त्यात सुद्धा ती खुलून दिसते, कारण हिच्या डोळ्यातच एक चमक आहे, हसण्यात गोडवा आहे . दिसायला खूप सुंदर नसून सुद्धा, नेहेमी बरोबर राहावी अशी.

तर हे असं असतं, आयुष्यात कायम मार्गारिटा बरोबर असते, पिंक लेडी ने कधीतरी झोप उडवली तर कधी ब्लू लगून च्या रोमँटिक बेटावर कोणीतरी भेटतं. पण जीच्या बरोबर वेळ काळ विसरून गप्पा माराव्या वाटतात ती एखादीच असते. आणि आपण तिच्या प्रेमात पडतो.

chef
सुधीर

How can we help you?